सोलापूर : सोलापुरातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. चिंताजनक बाब म्हणजे ग्रामीण भागातील सर्वाधिक मृत्यू हे बार्शी तालुक्यातील आहेत. एकीकडे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन मेहनत घेत आहे. तर दुसरीकडे अंधश्रद्धांना पेव फुटलं आहे. त्याचाच भाग म्हणजे बार्शीतल्या पारधी वस्ती येथे चक्क कोरोना देवीची स्थापना करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या देवीला खुश करण्यासाठी कोंबडे, बकरे आदींचा बळी देवून पूजन केलं जात असल्याची धक्कादायक माहिती देखील पारधी वस्तीतील स्थानिक नागरिकांनी दिली. बार्शी-सोलापूर रोडवर ही पारधी वस्ती आहे. या देवीची पुजा केल्याने कोरोनाची बाधा होत नाही अशी अंधश्रद्धा येथील स्थानिक नागरिक करत आहे.


कुठे टाईल्स फरशीचा छोटासा कट्टा करून तर कुठे लहान गोलसर दगड ठेवून त्यालाच कोरोना देवी समजून पुजा केली जात आहे. एका ठिकाणी अनेक फोटो असलेल्या देवघरात लिंबू ठेवून कोरोना देवीची स्थापना करण्यात आली आहे. कोरोनामुळे कोरोनाआईची स्थापना व पूजन केल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले असून देवीच्या अशा पद्धतीने सेवा केल्याने आमचे वाईट होणार नसल्याची त्यांची श्रध्दा आहे.

पाराबाई भगवान पवार यांनी आपल्या घरातील देवघरात लिंबू आणि इतर साहित्य ठेवून कोरोना देवीची प्रतिष्ठापणा केली आहे. "देवीच्या कृपेमुळे आम्हाला सर्दी, खोकला किंवा कसला त्रास नाहीये. इथे आम्ही कोरोनादेवीची स्थापना केली असून देवीमुळे आमच्या केसालाही धक्का लागत नाही, ज्याचा त्याचा मान दिला तर काही होत नाही." अशी प्रतिक्रिया दिली. तर कोरोनाचा काळात अहोरात्र कार्य करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रावर एका प्रकारे अविश्वास देखील त्यांनी बोलताना व्यक्त केला. "कोरोनामुळे मयत झाल्यावर हात लावू देत नाही, पॅक करून देता, किडण्या काढून घेतात की काय हे माहित पडत नाही" अशी प्रतिक्रिया पाराबाई पवार यांनी दिली.


पाराबाई सारखीच भावना पारधी वस्तीतील अनेक नागरिकांच्या आहेत. काही जणांना वाटतं की कोरोना देवीमुळे कोरोना पासून रक्षण होत आहे, तर काही जणांना वाटतं की या देवी मुळे कोरोनातून सुखरुपपणे आपण बाहेर पडलो. तर देवी साठी चक्क बळी देखील जात असल्याची भावना देखील यावेळी काही जणांनी बोलून दाखवली. याच परिसरात राहणाऱ्या कमलाबाई रोहिदास पवार यांनी देखील या देवीची स्थापना चक्क रस्त्यावरच केलीय. एका दगडात कमलाबाईंना कोरोना आईचं दर्शन होतंय. तर आम्ही तिला मरेपर्यंत माननार, आखाडाच्या महिन्यापासून हे सुरू आहे. यापुढेही आयुष्यभर सांभाळणार, देवीपासून आमचे चांगले होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलून दाखवली.


माणसाचे मन भावनिकतेने विचार करते. त्यातूनच अंधश्रध्देच्या आहारी गेल्याचे दिसून येते, अशी प्रतिक्रिया अंधश्रध्दा निर्मूलन समिती सदस्य विनायक माळी यांनी दिली. "कोरोना या विषाणूजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर हाच सध्या तरी उपाय असल्याचे आरोग्य संघटनेने सांगितले आहे. यापूर्वी देवी नावाच्या रोगाचे मोठ्या संख्येने रूग्ण होते त्यावर संशोधकांनी लस शोधून त्याचे निर्मूलन करण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले. कोरोनाच्या नावाखाली कोणी अंधश्रध्दा पसरवत असेल तर वैज्ञानिक दृष्टीकोनातून अशा प्रकारच्या अंधश्रध्देचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे, आरोग्यासाठी कोरोना रोगाचे मार्गदर्शन झाले पाहिजे." अशी प्रतिक्रिया अंधश्रध्दा निर्मूलन समिती सदस्य विनायक माळी यांनी दिली.


दरम्यान या बाबत आम्ही मानसोपचार तज्ज्ञांशी देखील संवाद साधला. सध्या कोरोना प्रादुर्भावमुळे सगळीच माणसे चिंताग्रस्त झाली असल्याचे दिसून येते. यातूनच नकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. या भावनिक अस्थिरतेतून काही जण अंधश्रेद्धेचे बळी पडत आहेत. प्राप्त परिस्थिती स्विकारत सकारत्मक विचार करावा. शासनाने आखून दिलेले नियम नागरिकांना पाळणं महत्वाचं असल्याचं मत बार्शीतील मानसोपचार तज्ज्ञ डॉ.महेश देवकते यांनी व्यक्त केलं.


कोरोनाचा बिमोड करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करत आहे. शासन देखील तितकीच मेहनत कोरोनाचं संकंट दूर करण्यासाठी घेत आहे. मात्र अंधश्रद्धेची महामारी ही देखील घातक असल्याचं वारंवार सिद्ध होतंय. केवळ शिक्षणाच्या अभावामुळेच बार्शीतल्या पारधी वस्तीतील काही नागरिक अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. त्यामुळे कोरोनासोबत अंधश्रद्धेपासून देखील बचाव करण्यासाठी शासन आणि प्रशासकीय यंत्रणांना प्रयत्न करावे लागणार आहे.