विदर्भ Rain Update : भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासह मध्यप्रदेशात मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना बसला आहे. पाचही जिल्ह्यात नदीकाठांवरील गावात पाणी शिरल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्व विदर्भातील या पाच जिल्ह्यात पुराची स्थिती भयानक झाली असून शेकडो गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. एनडीआरएफसह स्थानिक प्रशासनाच्या मदतीने पुरात अडकलेल्या लोकांचं बचावकार्य सुरु आहे. पाचही जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळं हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.


भंडारा जिल्ह्यातील 58 गावातील 2646 कुटुंबं बाधित


भंडारा जिल्ह्यात उदभवलेल्या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून जिल्ह्यातील 58 गावातील 2646 कुटुंब पूर बाधित झाले आहेत. प्रशासनाच्या वतीने मदत व बचाव कार्य युद्धस्तरावर सुरू आहे. या पुराचा फटाका भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर, पवनी, भंडारा, तुमसर, मोहाडी, या तालुक्यांना बसला असून गोंदिया जिल्ह्यातही तिरोडा तालुक्याला पुराचा फटाका बसला आहे, काल दिवसभर बचाव कार्य सुरू होते. भंडारा जिल्ह्यात NDRF ची टीम दाखल झाली आहे, तर राज्य राखीव दलाच्या तुकद्याही जिल्ह्यात आल्या असून लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.


सलग दुसऱ्या दिवशी भंडारा-नागपूर मार्ग बंद
तर राष्ट्रीय महामार्ग 6 वर नागपूर नाक्याजवळील भोजापूर नाल्यावर जवळपास 5 फूट पाणी असल्याने भंडारा-नागपूर मार्गही सलग दुसऱ्य़ा दिवशी बंद ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे ट्रकच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. शहरातील ग्रामसेवक कॉलनी, कस्तुरबा गांधी वार्ड, टाकळी भगतसिंग वार्ड, सिंधी कॉलनी, गुरुनानक कॉलनी, प्रगती कॉलनी, मेंढा परिसर महात्मा ज्योतिबा कॉलोनी, गणेशपूर, भोजापूर परिसरात या पुराचे पाणी शिरले आहे. प्रगती कॉलनी मधील जवळपास पंधरा ते वीस घर 5 ते 6 फूट पाण्याने वेढलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या घराच्या छतावर आश्रय घेतलेला आहे.


चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीत गोसीखुर्द धरणाच्या सोडलेल्या पाण्याचा कहर 


चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात गोसीखुर्द धरणाच्या सोडलेल्या पाण्याने कहर केला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज- पिंपळगाव- बेलगाव रणमोचन- बेटाळा -खरकाडा या गावांना पुराचा जबरदस्त फटका बसला आहे. वैनगंगा नदी वाहत असलेल्या भागांमध्ये पाऊस नसताना शेती व घरे पाण्याखाली गेल्याची विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेले तीन दिवस पाऊस पडलेला नाही. मात्र वैनगंगा नदीच्या दोन्ही काठावरील गावे पुराच्या वेढ्यात आहेत. पुरातील नागरिकांना मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि राज्य आपत्ती निवारण दलाच्या पथकांनी पूरग्रस्त गावांकडे कूच केले आहे. आगामी काळात यातील काही गावांमधील नागरिकांना सुरक्षित तालुका मुख्यालय आणले जाईल अशी शक्यता आहे. गोसेखुर्द धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग कमी झालेला नाही, सध्या या धरणातून 30267 क्यूसेक पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीत करण्यात येत आहे. त्यामुळे पारडगाव, किन्ही, बोडेगाव, नवेगाव या गावात पाणी शिरलं आहे तर बेटाळा हे पूर्णपणे पाण्याखाली गेलंय. मुख्य म्हणजे हेलिकॉप्टरला लँडिंग साठी जागा मिळत नसल्यामुळे एअरलिफ्टचे प्रयत्न सध्या थांबविण्यात आले आहेत. त्यामुळे पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याची सर्व जबाबदारी आता NDRF, SDRF आणि जिल्हा आपत्ती विभागाकडे आली आहे. सध्या पुण्यातून SDRF च्या 2 आणि नागपुरातून NDRF च्या 2 टीम दाखल झाल्या आहेत.

गडचिरोलीत पूरस्थिती दुसऱ्या दिवशीही कायम
गडचिरोली जिल्ह्यात पुरस्थिती दुसऱ्या दिवशी ही कायम आहे. पुरामुळं अनेक मुख्य मार्ग बंदच आहेत. पुराचं पाणी शेतात शिरल्याने पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. देसाईगंज शहरातील आशीर्वाद कॉलोनी, हनुमान वार्ड, गांधी वार्डातील शंभरहून अधिक घरे पाण्याखाली आली आहेत. त्यामुळं लोकांना सुरक्षित स्थळी अलवण्यात आले आहे. वैनगंगा, प्राणिता नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने नदीकाठी असलेल्या गावांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे. गोसेखुर्द प्रकल्पातून काल 30237 क्यूसेक्स इतका विसर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून गडचिरोली शहरातील विसापूर भागातील घरं पाण्याखाली गेली आहेच. इथून 5 लोकांना रेस्क्यू केलं आहे तर 300 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. कोटगल गावात कोटगल बॅरेजचं काम करणारे 23 कामगार अडकले होते. त्यांनाही आपत्ती व्यवस्थापनच्या टीमने रेस्क्यू करून सुरक्षित बाहेर काढले आहे.



नागपूर जिल्ह्यातील 25 गावांना पुराचा फटका


नागपूर जिल्ह्यातील 25 गावांना पुराचा फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे लवकर करण्याचे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. नागपूर जिल्ह्यातील खापा परिसरातील रामडोंगरी जवळ कन्हान नदीला अचानक पूर आल्याने त्या ठिकाणी 13 ट्रक नदीच्या पुरात अडकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हे ट्रक जवळच्या एका वाळू घाटावर वाळू उत्खननसाठी नदीच्या पात्रात गेले होते. मध्यप्रदेशात झालेले दमदार पाऊस आणि धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कन्हान नदीत पाणी पातळी वाढली. उत्खननासाठी गेलेले ट्रक पाण्याच्या प्रवाहात लांबपर्यंत वाहत गेले.




गोसे खुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले
2005 नंतर पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा सर्वाधिक फटका हा भंडारा शहराला बसला आहे. भोजापूर पुलावर पाणी असल्याने भंडारा-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच तसेच भंडारा तुमसर रस्ता सुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. भंडारा शहरातील बऱ्याच भागांमध्ये हा पुराचे पाणी शिरले असून बऱ्याच लोकांना त्यांच्या घराच्या छतावर आश्रय घ्यावा लागला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डेपो मध्ये आणि बसस्थानकामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे. त्यामुळे लालपरीची चाकं थांबलेली आहेत.

भंडाऱ्यात पूर, दोन राज्यांशी संपर्क तुटला, वैनगंगेला महापूर, तीन जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
शनिवारपासून भंडाऱ्यामध्ये पाऊस पूर्णपणे थांबला आहे. मात्र, मध्यप्रदेशच्या संजय सरोवर आणि गोंदिया जिल्ह्याच्या पुजारीटोला आणि आणि कालीसागर या धरणातील पाणी सोडल्यामुळे भंडारा जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. भंडारा शहराला सर्व बाजूने पाण्याचा वेढा निर्माण झाला आहे. त्यामुळे भंडारा तुमसर रोडवरील मेहंदी पुलावर चार ते पाच फूट पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे. हे पाणी जवळपास 5 किलोमीटरपर्यंत पसरलेलं असल्याने दाभा गावातील घरामध्ये पाणी शिरले आहे.



तब्बल पंधरा वर्षानंतर पूरपरिस्थिती
दुसरीकडे गोसे धरणाचे दारे उघडल्याने याचा फटका भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्याला बसला असून इटान गावातील 200 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. तब्बल पंधरा वर्षानंतर पुराची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. 2015 मध्ये सुद्धा संजय सरोवर आणि इतर धरणातून पाणी सोडल्याने अशीच पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. भंडारा शहराप्रमाणे, भंडारा ग्रामीण भागातील परिसरात हा पुराचे पाणी लोकांच्या घरात शिरले आहे. तुमसर तालुका आणि पवनी तालुक्यातही पुराचे पाणी बऱ्याच गावांमध्ये शिरलं आहे. त्यामुळे या सर्व भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे.