नागपूर : ऑनलाइन गेमिंगच्या  (Nagpur Online Fraud) नावाखाली नागपूरच्या तरुणाची 58 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या बुकी अनंत ऊर्फ सोंटू जैन तब्ब्ल तीन महिन्यांनंतर नागपूर पोलिसांना शरण येताच नवीन खुलासे समोर आले आहेत.  यात सोंटू जैनच्या आर्थिक व्यवहारात गोंदियातून मदत करणाऱ्या डॉ. गौरव बग्गा आणि अॅक्सिस बँकेचे मॅनेजर अंकेश खंडेलवाल यांच्या घरावर नागपूर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी केली. 


नागपूर पोलिसांनी केलेल्या छापेमारीत बग्गा यांच्या घरातून 1 कोटी 35 लाख रोकडसह 3 किलो 200 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आला. तर ॲक्सिस बँकेचे मॅनेजर यांच्या घरी सुद्धा छापेमारी करण्यात आली. मात्र त्या ठिकाणी कुठलीही रोकड मिळाली नाही. 


या आधी देखील सोंटू जैन यांच्या घरावर 22 जुलै 2023 रोजी नागपूर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी केली होती. त्यावेळी 16 कोटी 89 लक्ष रुपये रोख, 12 किलो 403 ग्रॅम सोने आणि 294 किलो चांदी जप्त केली होती. तर सोंटू जैन याला ज्या लोकांनी मदत केली त्याचा शोध नागपूर आर्थिक गुन्हे शाखा घेत असून यात आणखी आरोपी अटक होणार असल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांना दिली आहे.


सोंटू जैनने ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून नागपुरात स्थायिक झालेल्या एका मोठ्या तांदूळ व्यापाऱ्याच्या तरुण मुलाची तब्बल 58 कोटी रुपयांनी फसवणूक केली होती. ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून झटपट कोट्यवधी रुपये कमवण्याचे स्वप्न दाखवून ही फसवणूक करण्यात आली होती. त्याने अशाच पद्धतीने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.


अनंत उर्फ सोंटू जैनने विक्रांत अग्रवाल नावाच्या व्यापाऱ्याची ऑनलाईन गेमिंग मध्ये 58 कोटी रुपयांनी फसवणूक केली होती. 21 जुलै रोजी विक्रांत अग्रवाल याने नागपूर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर 22 जुलै रोजी नागपूर पोलिसांनी सोंटूच्या गोंदिया येथील घरावर धाड टाकली होती. तेव्हा सोंटूच्या घरातून तब्बल 12 किलो सोनं, 294 किलो चांदी आणि सुमारे 17 कोटींची रोख रक्कम मिळाली होती. नंतर गोंदिया मधील सोंटू जैनच्या काही बँक लॉकरमधूनही 4.54 कोटी रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली होती. 


या ऑनलाइन गेमिंग फसवणूक प्रकरणात एक दोन नव्हे तब्बल 55 बँक खात्यांचा वापर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यामध्ये त्याचे नोकर, घरकामगार, मजूर, चप्पल बनवणारे अशा अनेक गरिबांच्या बँक खात्यांचा वापर करण्यात आला आहे. सोंटू जैनने कोट्यवधींची रक्कम या 55 खात्यातून फिरवून तपास यंत्रणांची दिशाभूल केल्याचे उघड झालं आहे.


धाड पडण्याच्या तीन दिवस आधी म्हणजेच 19 जुलै रोजी सोंटू जैन दुबईला पळून गेला होता. दीड महिन्यानंतर तो नागपुरात आला होता. मात्र तोवर त्याने वकिलांच्या मदतीने अटकपूर्व अंतरिम जामीन मिळवला होता. नंतर न्यायालयाने त्याचा अटकपूर्व अंतरिम जामीन रद्द केला होता. त्यानंतर सोंटू जैनला नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. 


ही बातमी वाचा: