Mahadev Online Gaming App Case: महादेव बुक अॅप प्रकरणी (Mahadev App Case) आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महादेव बुक अॅप आणि त्यासंबंधित विविध बुक अॅपवर आजही अवैध ऑनलाईन जुगाराचा धंदा (Online Gaming App) सुरूच आहे. त्यामुळे या विविध अॅप्सवर कोणतंही बंधन किंवा बंदी का नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल होऊन या अॅप चालवणाऱ्यांवरील कारवाईनंतरही हे अॅप्स अजूनही सोशल मीडियावर सक्रीय आहेत. आज विशेष म्हणजे, टीम इंडिया-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांच्या जुगारासाठी जास्त प्रमाणात जाहिरात केली गेली आहे आणि मोठ्या प्रमाणात जुगार खेळा जाणार आहे. आम्ही सोशल मीडियावर हे अॅप सर्च केलं आणि प्रत्येक अॅपमध्ये आजच्या भारत-पाकिस्तान सामन्याची जाहिरात असल्याचं आढळलं.
महादेव बुक अॅप, खेलोयार, लेझर बुक अॅप, लायन क्लब अॅप, विनबझ, फेअरप्ले, रेड्ड्याना, लोटस 365 यासारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे अॅप्स अजूनही सोशल मीडियावर सक्रीय आहेत. अजुनही कार्यरत असलेल्या या अॅपवर एजन्सी कारवाई का नाही करत? काही महिन्यांपूर्वी एजन्सींनी त्यांचा शोध सुरू केल्यानंतर सौरभ चंद्राकर (Saurabh Chandrakar) आणि रवी उप्पल परदेशातमध्ये पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पळून गेलेल्या आरोपींसोबतच सध्या सुरू असलेले ऑनलाईन बेटिंग अॅप्स आरोपी नेमके कुठून आणि कोणामार्फत चालवतायत? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ईडीकडून कसून तपास सुरू
महादेव बुक अॅप प्रकरणाच्या तपासादरम्यान, ईडीला दररोज नवी माहिती मिळत आहे. या संदर्भात ईडीनं अनेक बॉलिवूड कलाकारांना समन्स बजावलं आणि त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासही सांगितलं. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासादरम्यान, आरोपींनी महादेव बुक अॅप आणि त्याच्याशी संबंधित इतर अॅप्लिकेशन्सद्वारे कमावलेल्या कोट्यवधी रुपयांचा वापर करून अमाप मालमत्ता खरेदी केल्याचं उघड झालं आहे. ईडी आता महादेव अॅप प्रकरणी चंद्राकरच्या मालमत्तेसह त्यांची कागदपत्र आणि त्यांच्या खरेदी, विक्रीशी संबंधित माहिती गोळा करत आहे. कोट्यवधी रुपयांच्या गुन्ह्यातील पैसे कुठे गुंतवले गेले आणि कोणाकडे गेले, यासंदर्भात माहिती मिळू शकेल. याव्यतिरिक्त या माहितीच्या आधारे ईडी आता त्या सर्व मालमत्ता आणि मुंबईजवळ बांधण्यात येणाऱ्या पंचतारांकित हॉटेलशी संबंधित कागदपत्रं गोळा करण्याचा प्रयत्न करत असल्याचं ईडीच्या सुत्रांनी सांगितलं आहे.
मनी लॉन्ड्रिंगचं मोठं नेटवर्क, बॉलिवूडकर रडारवर
महादेव बेटिंग अॅप प्रकरणी ईडी सातत्यानं छापेमारी करत आहे. तसेच, याप्रकरणी अनेकांची चौकशीही करण्यात आली आहे. आता याप्रकरणी बॉलिवूड रडारवर आलं आहे. बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर सारख्या अनेक मोठ्या नावांचा या प्रकरणात समावेश असल्याची माहिती मिळत आहे. या वर्षी फेब्रुवारी 2023 मध्ये, संयुक्त अरब अमिरातीमध्ये एक शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नात 200 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हे लग्न सौरभ चंद्राकरचं होतं. सौरभ हा छत्तीसगडमधील भिलाई येथील रहिवासी आहे. सौरभनं त्याचा मित्र रवी उप्पलसोबत 'महादेव ऑनलाईन अॅप' सुरू केलं होतं. या अॅपवर ऑनलाईन बेटिंग केली जाते. त्याच्याशाही विवाह सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी मोठमोठे सेलिब्रिटी आले होते. या लग्नाच्या शाही थाटामुळे आणि खर्चामुळे हे लग्न ईडीच्या निशाण्यावर आलं आणि त्यानंतर मनी लॉन्ड्रिंगचं सर्वात मोठं नेटवर्क उघड झालं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :