नागपूर : मास्क लावला नाही या कारणामुळे नागपूरच्या पारडी परिसरात पोलिसांच्या मारहाणीत एका दिव्यांग दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय. मनोज ठवकर असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून त्यांनी केवळ मास्क लावला नाही या कारणामुळे त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मृताच्या कुटुंबियांनी केला आहे. 


मनोज ठवकर हे बुधवारी संध्याकाळी काही कामानिमित्ताने बाजाराला गेले होते. तिथून ते परत घरी येत असताना पारडी परिसरात पोलिसांची नाकाबंदी लावून ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह आणि मास्क संदर्भातली कारवाई सुरू होती.


पोलिसांनी मनोज यांना थांबण्याचा इशारा केल्यानंतरही मनोज आपली दुचाकी घेऊन पुढे गेले. त्यामुळे त्यांच्या दुचाकीची धडक एका पोलीस कर्मचाऱ्याला बसली. त्यानंतर रागावलेल्या पोलिसांनी मनोज ठोकर यांना त्या ठिकाणीच मारहाण केली. थोड्या वेळाने पोलीस स्टेशन मध्ये नेऊन मनोज यांना पुन्हा मारहाण केली गेली. याच मारहाणीमध्ये मनोज ठवकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी आणि पारडी परिसरातील नागरिकांनी केला आहे.


पोलीस स्टेशनमध्ये मनोज निपचित पडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच रुग्णालयासमोर मोठ्या संख्येने नागरिक गोळा झाले होते. नागरिकांनी पोलीस प्रशासन विरोधात रोष व्यक्त करणे सुरु केल्यानंतर वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. सध्या या परिसरात परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात आहे.


मनोज ठवकर यांचा मृत्यू कसा झाला याविषयी पोलीस अधिकारी कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत. या घटनेमुळे नागपूर पोलिसांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे.


महत्वाच्या बातम्या :