Nagpur News : नागपूरमध्ये थंडीचा कडाका जीवघेणा ठरू लागला आहे. गेल्या दोन दिवसांत रस्त्यावर रात्र काढणाऱ्या दोघांचा मृत्यू झालाय. दोघांचाही मृत्यू थंडीमुळे झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागपूरच्या कपिल नगर परिसरात 53 वर्षीय ट्रकचालक अशोक सोनटक्के यांचा ट्रकमध्येच मृत्यू झाला आहे. ते ट्रकच्या केबिनमध्ये झोपले होते आणि तिथेच ते मृतावस्थेत आढळले. तर जागनाथ बुधवारी परिसरात रस्त्यावरच 60 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा फुटपाथवर मृत्यू झाला आहे. 


देशासह राज्यात सध्या थंडी वाढताना दिसत आहे. अशातच वाढत्या थंडीमुळे झालेले मृत्यू अत्यंत धक्कादायक आहेत. नागपुरात झालेले दोन मृत्यू हे थंडीमुळेच झाल्याचं म्हटलं जात आहे. राज्यातही थंडी वाढत असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पारा घसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशभरात थंडीची लाट पसरली आहे. डिसेंबर महिना संपताना महाराष्ट्रातही तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. नागपुरात पारा 8.5 अंशांवर घसरला आहे. तर कोल्हापुरातही पारा घसरला असून 14 अंशांवर घसरला आहे. त्याचबरोबर जिल्हात काही ठिकाणी धुक्याची चादर पसरली आहे.


धुळ्यात सलग तिसऱ्या दिवशी तापमानाचा पारा घसरतोय. आज तर धुळ्याचं तापमान 5.6 अंशांवर आलं आहे. त्यामुळे वातावरणातील गारठा वाढला आहे. हाडं गोठवणारी थंडी असल्यानं धुळेकरांनी घरात राहण्यालाच पसंती दिलीय. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळही कमी झालीय. तर तिकडे परभणी जिल्ह्यात तापमान 8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. मागच्या 6 दिवसांपासून जिल्ह्यात कडाक्याची थंडी आहे. थंडीपासून बचावासाठी सामान्यांना विविध उपाय करावे लागत आहेत. दुसरीकडे रब्बी पिकांना मात्र याचा फायदाच होत आहे. 


देशभरात थंडी 


 उत्तर भारतात थंडीची लाट आल्यानं तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय. तापमान कमालीचं घटल्यानं आता जलस्त्रोतही गोठायला सुरुवात झाली आहे. काश्मीर खोऱ्यातील तांगमार्ग जवळ असलेला द्रांग धबधबा थंडीमुळे गोठला आहे आणि पाण्याऐवजी आता उंचावरून बर्फच कोसळताना दिसत आहे. हे विहंगम दृष्य पाहण्यासाठी पर्यटकही इकडे वळताना दिसत आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :