Nagpur News : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान नागपुरातील जामठा (VCA Nagpur) येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (VCA) स्टेडियमवर आज, 23 सप्टेंबर रोजी होऊ घातलेला सामना बघण्यासाठी आलेल्या क्रिकेटप्रेमींकरता महामेट्रोने विशेष सोय केली आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या विनंतीनुसार, महा मेट्रोने न्यू एअरपोर्ट स्टेशन (New Airport Metro Rail Station) येथून मेट्रो गाड्या चालवण्याची व्यवस्था केली आहे. सामना संपल्यावर एक वाजेपर्यंत मेट्रोतर्फे गाड्या चालणार असून प्रेक्षकांना या माध्यमाने आपल्या गंतव्यावर पोहोचणे सुकर होणार आहे.
इतर मार्गांवर नियमित रात्री 10 पर्यंतच सेवा
ऑरेंज (Orange Line) आणि अॅक्वा लाईन (Aqua Line) वरील नियमित प्रवासी मेट्रो सेवा रात्री 10 वाजेपर्यंत उपलब्ध असेल. सामना संपल्यानंतर रात्री 1 वाजेपर्यंत, न्यू एयरपोर्ट मेट्रो स्टेशन येथून इतर सर्व कार्यरत मेट्रो स्टेशन येथे परत येण्याकरता मेट्रो सेवा उपलब्ध असेल. ऑरेंज मार्गावर प्रवास करणारे क्रिकेटप्रेमी सीताबर्डी इंटरचेंज (Sitabuldi Interchange) येथून अॅक्वा मार्गिकेवर प्रवास करण्याकरता गाडी बदलू शकतात.
जातानाच रिटर्न तिकीट घ्या
सामना बघण्याकरता जातानाच प्रवासी ज्या स्थानकावरुन मेट्रो गाडीत बसतील तेथून त्यांनी त्याच वेळेला परतीचे तिकीट (रिटर्न) देखील खरेदी करण्याचे आवाहन (Return Ticket of Metro) महा मेट्रोने केले आहे. तिकीट अगोदर घेतले असेल तर परतीच्या प्रवासात तिकीट घेण्याची गरज पडणार नाही आणि प्रवाशांच्या वेळेची बचत देखील होणार असल्याने ही व्यवस्था केली आहे.
एअरपोर्ट ते स्टेडियमसाठी 60 बसेसची व्यवस्था
सामना सुरु होण्याच्या आधी (Before Match) न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते व्हीसीए स्टेडियम जामठा आणि संपल्यावर जामठा ते न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत प्रेक्षकांना नेण्यासाठी 60 बसची व्यवस्था विदर्भ क्रिकेट असोसिएशनने (VCA) केली आहे. क्रिकेट रसिकांच्या सोयीकरता होणाऱ्या या सोयीचा लाभ त्यांनी घ्यावा हे आवाहन महा मेट्रोतर्फे करण्यात येत आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळता येईल. तसेच मेट्रो स्थानकांवर मुबलक प्रमाणावर पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
IND vs AUS, T20 : आज रंगणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी टी20, कधी, कुठे पाहाल सामना?