Nagpur Railway Crime : रेल्वे गाडीच्या स्वच्छतागृहात गेल्यावर नळाची तोटी नसल्यानं पाईपमधून वाहतं पाणी पाहून आपण रेल्वे प्रशासनासह सरकारला पोटभरून शिव्या देतो. मात्र, नागपुरात रेल्वेतील नळाच्या तोट्या गायब असल्यामागे सरकार नव्हे तर तुमच्या आमच्यातले काही सिकंदर कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या रेल्वे गाडीच्या स्वच्छतागृहातून नालाच्या तोट्या चोरणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून 55 नळ जप्त केले असून त्याने आजवर शेकडो नळ चोरून रेल्वेला मोठा चूना लावल्याची माहिती समोर आली आहे.
आधी चोर फक्त सोने चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू चोरायचे. मात्र, आता आपल्या वाईट सवयी भागवण्यासाठी नवखे चोर मिळेल ती वस्तू लंपास करतात. त्यामुळे अंमली पदार्थांची सवय असलेले चोर कधी काय आणि कोणती वस्तू चोरतील याचा नेम नाही. अशाच एका चोराला रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी रंगेहात अटक केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, या चोराने चक्क रेल्वे गाडीतील नळ चोरले होते. सिकंदर जहीर खान असे त्याचे नाव असून सिकंदर नागपूर रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एक्सप्रेस गाड्यांच्या स्लीपर कोचच्या स्वच्छतागृहातील नळ तोट्या चोरी करायचा. चोरलेल्या नळ तोट्या विकून मिळणाऱ्या पैशातून सिकंदर त्याचे अमली पदार्थांचे व्यसन पूर्ण करायचा.
वारंवार होणारी नळांची चोरी आरपीएफसाठी आव्हानात्मक होती
गेल्या काही दिवसांपासून नागपूर रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांमधील अनेक बोगीतील नळ चोरीला जात असल्याने रेल्वे सुरक्षा दलाचे जवान सुद्धा बुचकळ्यात पडले होते. दिवसागणिक वाढत जाणाऱ्या नळ चोरीच्या घटनांमुळे चोराला अटक करण्यासाठी आरपीएफचे जवान रेल्वे स्टेशनवर साध्या वेशात तैनात करण्यात आले होते. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर सिकंदर खान रेल्वे गाड्यांच्या अनेक स्वच्छतागृहात वारंवार जात असल्याचे निदर्शनास येताच आरपीएफ जवानांनी त्याला थांबवत विचारपूस केली. तेव्हा तो उडवाउडवीची उत्तर देत असल्याने जवानांनी त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्या जवळ अनेक नळ आढळून आले. त्यानंतर सिकंदरला अटक करण्यात आली.
सिकंदरकडून 55 नळ जप्त, तर आजवर शेकडो नळ चोरल्याची माहिती
रेल्वे सुरक्षा दलानं दिलेल्या माहितीप्रमाणे, आरोपी सिकंदरने आजवर एक दोन नव्हे. तर 200 पेक्षा जास्त नळ चोरल्याची माहिती पुढे आली आहे. 55 नळ तोट्या त्याच्याकडून जप्त ही करण्यात आले आहेत. दरम्यान त्याने कोणाकोणाला चोरलेले नळ विकले याचा तपास ही आरपीएफने सुरु केला असून एका व्यक्तीला आरपीएफने अटकही केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- फेसबुकवर सांगायचा चित्रपट दिग्दर्शक, पण होता घरगडी; नवोदित अभिनेत्रींना फसवणारा खंडणीखोर अटकेत
- राजस्थानात आरोपीवर गोळीबार करणाऱ्या गुंडाला अटक; राजस्थान आणि वालीव पोलिसांची संयुक्त कारवाई
- सोनसाखळी चोरणा-या सराईत चोराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह