Mumbai Crime News : मुंबई म्हणजे, मायानगरी असं म्हटलं जातं. मुंबई अनेक चांगल्या वाईट घटनांची साक्षीदार असते. मुंबईचा सर्वात अविभाज्य घटक म्हणजे, फिल्मसिटी. या फिल्मसिटीमध्ये अनेक तरुण-तरुणी आपलं नशीब आजमावण्यासाठी येतात. अनेकांना संधी मिळते पण अनेकांच्या पदरी निराशा येते. अशातच अनेकजण या तरुण-तरुणींच्या स्वप्नांचा फायदाही घेताना दिसतात. अशीच काहीशी घटना घडली आहे, मुंबईच्या मालाडमध्ये. चित्रपटांत काम देतो सांगून हा दिग्दर्शक मुलींचे अर्धनग्न फोटो काढायचा आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करतो अशी धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळायचा. पोलिसांनी य दिग्दर्शकाला बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबईतील मालाड पोलिसांनी कारवाई करत तरुणींना फसवणाऱ्या दिग्दर्शकाला अटक केली आहे. या दिग्दर्शकाचं नाव ओम प्रकाश तिवारी. जो स्वतः बॉलिवूडमध्ये मोठा दिग्दर्शक असल्याचं सांगून सोशल मीडिया प्रोफाईल बनवून मुलींची फसवणूक करत होता. तिवारी तरुणींना वेब सिरीज आणि चित्रपटांमध्ये काम देतो, बॉलिवूडमध्ये माझी खूप ओळख आहे, असं सांगायचा. पण प्रत्यक्षात मात्र ओम प्रकाश तिवारी हा घरकाम करायचा. याशिवाय त्यानं अनेक सिनेमांत छोटा-मोठा रोल देखील केला आहे. याशिवाय त्यानं अनेक फिल्म सेटवर कामही केलं आहे.
स्वतः केलेल्या कामाचा फायदा त्यानं घेतला आणि एका बंगाली अभिनेत्रीशी सोशल मीडियावरुन मैत्री केली. या अभिनेत्रीला वेब सिरीजमध्ये काम देतो असं सांगून मुंबईत बोलावून घेतलं. त्यानंतर तिला ऑडिशन देण्यास सांगितलं. या अभिनेत्रीचे अर्धनग्न फोटो काढून घेतले. त्यानंतर त्यानं त्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्याकडून बक्कळ पैसे उकळले. याप्रकरणी अभिनेत्रीनं पोलिसांत धाव घेत, मुंबईतील मालाड पोलीस स्थानकांत तक्रार दाखल केली. अभिनेत्रीनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आयपीसी 345 A, B, 67A नुसार, गुन्हा दाखल करुन आरोपीला 48 तासांच्या आत अटक केली.
दिग्दर्शकांच्या भलथापांना भुरळून मुंबईत आलेली बंगाली अभिनेत्री मुळची कोलकाता येथील आहे. सध्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे तिला काम मिळत नव्हतं. ती कामाच्या शोधात होती. अशातच आरोपी ओम प्रकाश तिवारीच्या ती संपर्कात आली आणि त्याच्या जाळ्यात अडकली. या खोट्या आणि खंडणीखोर ओम प्रकाश तिवारीने अशाच प्रकारे अनेक मुलींची फसवणुक केल्याचा संशय मुंबई पोलिसांना आहे. अशा प्रकारे ज्यांची फसवणूक झाली आहे. त्यांनी तात्काळ पोलिसांना संपर्क करावा, असं आवाहन देखील मुंबई पोलिसांनी केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचं मोठं रॅकेट उघड; दोन व्यावसायिकांना अटक
- बाबो...! किराणा दुकानात तलवारी अन् सुऱ्या विक्रीला! पोलिसांनी टाकला छापा, एकाला अटक
- Navi Mumbai : सीजीएसटी आयुक्तालकडून 70 कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह