Nagpur News: नागपूर : फेसबुकवरील (Facebook) जाहिरातीतील आमिष एका वयोवृद्ध नागरिकाला चांगलेच महागात पडले आहे. सायबर गुन्हेगाराने एका वयोवृद्ध नागरिकाची अडीच कोटींची फसवणूक (Fraud) केली आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस लाभ देण्याचे आमिष दाखवून नागरिकाला गंडा (Crime) घातला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. ही या नवीन वर्षातील सर्वात मोठी फसवणूक असल्याचे बोलले जात आहे. 


अधिक नफ्याचं आमिष भोवलं


नागपुरातील रामदास पेठ येथील रहिवासी फिर्यादी मोती दुलारामानी (78) यांचा व्यवसाय होता. खाद्यपदार्थांना सुगंध येण्यासाठी वापरण्यात येणारे पावडर आणि केमिकलचे ते मोठे व्यापारी होते. वयोवृद्ध असल्याने त्यांनी व्यवसायातून निवृत्ती घेतली. सध्या त्यांची मुले विदेशात वास्तव्यास आहेत. त्यामुळे ते सध्या एकटेच राहतात. दुलारामानी फावल्या वेळात मोबाईल हाताळत असताना त्यांना फेसबूकवर एक जाहिरात दिसली. ज्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास 15 ते 20 टक्के नफा मिळवून दिला जाईल, असे सांगण्यात आले.


यावर विश्वास दर्शवत जाहिरातीत दिलेल्या मोबाईल नंबरवर दुलारामानी यांनी संपर्क साधला. त्यानंतर संशयित आरोपीने एक लिंक पाठविली तसेच स्टॉक फ्रंटलाईन या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला देखील त्यांना जोडून घेतले. या ग्रुपमधील इतर सदस्य त्यांना लाखांमध्ये लाभ झाल्याचा मेसेज टाकत होते. तर काही सदस्यांनी पुराव्याखातर स्क्रीन शॉट टाकून नफा झाल्याचे जाहीर केले. हा प्रकार पाहून दुलारामानी मोहात पडले आणि त्यांना या जाहिरातीवर विश्वास बसला. 


 गुंतविले पावणेतीन कोटी, परतावा केवळ 26 लाख 


संशयिताच्या जाळ्यात दुलारामानी फसल्याचे लक्षात आल्या नंतर संशयिताने त्यांना डीमॅट अकाऊंट उघडायला सांगितले. संशयिताच्या सांगण्यावरून त्यांनी डीमॅट अकाऊंट उघडले. फिर्यादी जाळ्यात अडकल्याचे पाहून त्यांना संशयिताने बनावट लिंक पाठविली. त्यांना शेअर खरेदी-विक्री करण्यास बाध्य केले. दरम्यान फिर्यादीने 11 नोव्हेंबर 2023 ते 8 जानेवारी 2024 या कालावधीत पाठवलेले दोन कोटी 75 लाख रुपये संशयिताने पेमेंट लिंकवर वळते केले. ही रक्कम संशयिताच्या खात्यात जमा झाली.


विश्वास संपादन करण्यासाठी संशयिताने दुलारामानी यांना 26 लाख 31 हजार रुपयांचा लाभ दिला. तसेच लाखात लाभ मिळाल्याचे त्यांना ऑनलाईन दिसत होते. त्यांनी उर्वरित रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, डीमॅट अकाऊंट रिचार्ज करावे लागेल, असे संशयिताकडून सांगण्यात आले.  त्यांना पुन्हा शेअर खरेदीसाठी रक्कम पाठवण्यास सांगण्यात आले. ही बाब लक्षात आल्यानंतर दुलारामानी यांना संशय आला. त्यांनी संशयित आरोपीला रक्कम परत मागितली. त्यावेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून त्यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: