Nagpur News नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्षात उभी फूट पडल्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांच्या (Sharad Pawar) वयावर सातत्याने टीका केली आहे. ज्येष्ठांनी मार्गदर्शन करावे, राजकारणातून निवृत्ती घ्यावी, असे त्यांनी सुरूवातीलाच म्हटले होते. त्यानंतरही अजित पवार शरद पवारांच्या वयावरून अनेकदा बोलले आहेत.
याच मुद्द्यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) अजित पवारांवर सडकून टीका केली आहे. वयोमानाच्या मर्यादा भाजपने इतरांसाठी लावल्या आहेत. पण त्यांनी स्वतः पद सोडलेले नाही. अजित पवार यांच्यात जर खरंच हिंमत असेल तर त्यांनी आता पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) निवृत्त व्हा, असे बोलून दाखवावे. मग बघा त्यांचा 70 हजार कोटीचा भ्रष्टाचार कसा बाहेर येतो, ते कळेल, अशा शब्दात नाना पटोलेंनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडले आहे.
मोदींचे सुद्धा वय विचारलं पाहिजे
राहुल गांधींची मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रा सुरू होत असताना काँग्रेसचा एक नेता शिंदे गटात गेला. अजूनही काँग्रेसचे नेते खेचण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे. त्यांनी 86 वर्षीय सुशीलकुमार शिंदेंना पक्षात घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे वयोमानाच्या मर्यादा भाजपाने इतरांसाठी लावल्या आहेत. पण त्यांनी स्वतः पद सोडलेले नाही. अजित पवारांनी मोदींचे सुद्धा वय विचारलं पाहिजे. मग त्यांची हिंमत दिसेल. सोशल मीडियावर फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. गिरीश महाजन आणि अजित पवार यांची काय हालत करून ठेवली त्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. अजित दादांनी आपल्या काकांचं वय विचारण्यापेक्षा मोदी साहेबांचे वय विचारला पाहिजे, असा टोला देखील नाना पटोलेंनी अजित पवारांना लगावला आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
अजित पवार म्हणाले, वय झाल्यानंतर आपण थांबायचे असते. काहीजण सत्तरी झाली की थांबतात. काही जण वय 75 झाले की थांबतात. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत. 80 वय झालं तरी माणूस थांबत नाही. बहुजनांच्या कल्याणासाठी आपण सत्तेत गेलो आहोत. वय झाल्यानंतर आपण थांबयचं असतं. आम्ही देखील 5 वेळेस राज्याचे उपमुख्यमंत्रिपद सांभाळले आहे. राष्ट्रवादीचे सर्व नेतेमंडळी चांगल्या प्रकारे काम करत आहे, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या: