नागपूर: नागपुरात (Nagpur) एका सुनेने स्वतःच्या 80 वर्षीय सासूची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. नागपूर शहरातील प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संभाजी चौक परिसरात ही घटना घडली. ताराबाई शिखरवार असं हत्या झालेल्या वृद्ध महिलेचं नाव आहे, तर पूनम शिखरवार असं हत्या करणाऱ्या आरोपी महिलेचं नाव आहे. प्रतापनगर पोलिसांनी आरोपी सुनेला अटक केली आहे.
सासू ताराबाई आणि सून पूनम यांच्यात कौटुंबिक कारणाने वाद झाला होता. या वादाने स्फोटक रुप घेतलं, त्यावेळी संतापलेल्या सुनेने सासू ताराबाईवर चाकूने हल्ला केला आणि या घटनेत ताराबाई यांचा मृत्यू झाला आहे.
याआधीही नागपुरात एका दिवसात 3 हत्या
नागपुरात चोरीच्या घटनांसह हत्येच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. उपराजधानी नागपुरात 20 ऑगस्टला देखील 24 तासांत चार वेगवेगळ्या घटनेत तिघांची हत्या झाली असून जीवघेण्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले, त्यामुळे नागपुरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
हत्येची पहिली घटना
जरीपटका पोलीस स्टेशनअंतर्गत नारा परिसरात काल रात्री उशिरा हत्येची पहिली घटना घडली. महेश कुमार उईके या तीस वर्षीय मजुराची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. शेजारीच राहणाऱ्या राजकुमारी उईके आणि करण नावाच्या मजुरांनी मिळून मजुराची हत्या केली. महेशही मजूर, तो शेजारी राहणाऱ्या राजकुमारीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्याच रागातून राजकुमारीने आपल्या पुरुष मित्र करणच्या मदतीने महेशवर धारदार शस्त्राने हल्ला केला आणि त्याला गंभीर जखमी केलं. रविवारी (20 ऑगस्ट) रुग्णालयात उपचारादरम्यान महेश उईके याचा मृत्यू झाला.
हत्येची दुसरी घटना
यशोधरा नगर पोलीस स्टेशनअंतर्गत कांजी हाऊस चौकात रविवारी संध्याकाळी सात वाजता हत्येची दुसरी घटना घडली. बादल पडोळे या पंचवीस वर्षीय कुख्यात गुन्हेगाराला परिसरातीलच चेतन सूर्यवंशी नावाच्या दुसऱ्या गुन्हेगाराने धारदार शस्त्राने हल्ला करून जीवे मारलं. गुन्हेगारी जगतातील जुन्या वैमनस्यातून बादलची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे.
हत्येची तिसरी घटना
हत्येची तिसरी घटना काटोल नाक्याजवळ उघडकीस आली. गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेला ट्रक चालक मेहबूब खान याचा मृतदेह रविवारी काटोल नाक्याजवळील एका नाल्यात आढळून आला. अमरावती जिल्ह्यातील वरूड येथून ट्रकमधून कृषीजन्य पदार्थ भरून नागपूरला आणण्यासाठी गेलेले मेहबूब खान दहा दिवसांपासून बेपत्ता होते. ते बेपत्ता असल्याची तक्रार नागपुरातील कपिल नगर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली होती, तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. रविवारी (20 ऑगस्ट) दुपारी त्यांचा मृतदेह काटोल नाका जवळील नाल्यात आढळून आला, त्यांची हत्या सोबतच्या ट्रक चालकांनी केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Nagpur Crime: नागपुरात मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाच जणांना अटक