नागपूर : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या उत्थानासाठी कार्य केले जात आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क नागपूर शहरामध्ये साकारण्याले जाईल, अशी घोषणा केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी संयुक्तरित्या केली.


भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय अंतर्गत जेष्ठ नागरिक व दिव्यांगाना अनुक्रमे केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना- 2021 आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप- असिस्टंट टू डिसेबल पर्सन) या अंतर्गत भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम ( ALIMCO- Artifical Limbs Manufacturing Corporation Of India), नागपूर महानगरपालिका, नागपूर जिल्हा प्रशासन आणि समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास पुनर्वास एवं दिव्यांग जन सशक्तीकरण केंद्र (सी.आर.सी. नागपूर) च्या वतीने दक्षिण नागपुरातील दिव्यांग आणि 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहायक साधने गुरुवारी, २५ ऑगस्ट रोजी रेशीमबाग मैदानात केंद्रीय मंत्री, सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते साहित्य वितरणाचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.
 
संतांच्या प्रेरणेतून गरजूंचे जीवन सुसह्य करण्यासाठी पुढाकार


यावेळी नितीन गडकरी म्हणाले, संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. राष्ट्रीय वयोश्री योजना- 2021 आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप- असिस्टंट टू डिसेबल पर्सन) हा त्याचाच एक भाग असून यामार्फत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांचे जीवन सुसह्य व्हावे हा मानस आहे. समाजातील शोषीत, वंचीत, गरीबांच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणा-या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय संकल्पनेवर आज केंद्र सरकार कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून हे राज्य वैचारिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्याच्या दृष्टीने येथील संतांचे योगदान मोठे आहे. संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी समाजातील वंचित घटकासाठी केलेले कार्य आज प्रेरणास्त्रोत आहेत. त्याच प्रेरणेतून ज्येष्ठ आणि दिव्यांगांचे जीवन सुसह्य करण्यासाठी पुढाकार घेता आल्याचे ते म्हणाले.


देशातील सर्वात मोठे शिबीर


केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित सहाय्यक साधने वितरीत करण्यासाठीचे हे शिबिर देशातील सर्वात मोठे असल्याचे उद्गार काढीत गौरव केला. त्यांनी केंद्र शासनाच्या केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. राष्ट्रीय वयोश्री योजना-2021 आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप- असिस्टंट टू डिसेबल पर्सन) अंतर्गत अनेकांच्या जीवनात आनंद फुलल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. नागपूर शहरात साकारण्यात येणा-या महाराष्ट्रातील पहिल्या दिव्यांग पार्कच्या संकल्पनेबद्दलही त्यांनी गडकरी यांचे अभिनंदन केले व या पार्कसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहिर केले.


35 कोटींच्या 2 लाखांवर उपकरणांचा वाटप


केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना- 2021 आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप असिस्टंट टू डिसेबल पर्सन) या अंतर्गत साहित्य वितरणासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे 27 फेब्रुवारी ते 20 मार्च 2022 या कालावधीत दहाही झोन अंतर्गत नोंदणी शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरांच्या माध्यमातून नागपूर शहरातील 35,136 लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून त्यांना 35 कोटी रुपये किंमतीची 2,34,781 उपकरणे वितरीत केले जाणार आहेत. याअंतर्गत गुरूवारी दक्षिण नागपुरातील 9018 लाभार्थ्यांना (अडीप - 854, वयोश्री- 8164) एकूण 68,683 रुपये 9.19 कोटी किंमतीची साहित्य, उपकरणे (अडीप- 1731, वयोश्री- 66952) वितरित करण्यात आले. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले. यावेळी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाचे अपर सचिव सुरेंद्र सिंग, जिल्हाधिकारी विपीन इटणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  योगेश कुंभेजकर, दिव्यांग उद्योजक जयसिंग चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन रेणूका देशकर यांनी केले व आभार समाज विकास विभागाचे उपायुक्त विजय हुमने यांनी मानले. 
 
दिव्यांगांनी उधळले कलागुणांचे रंग


ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना सहाय्यक उपकरणे वितरण शिबिराच्या प्रारंभी दिव्यांगांनी आपल्या कलागुणांचे रंग उधळले. आनंदवन येथील ‘स्वरानंदवन’च्या दिव्यांग कलावंतांनी गायन आणि नृत्याचे अप्रतिम सादरीकरण केले. या सादरीकरणाला उपस्थित लाभार्थ्यांनी आणि मान्यवरांनी भरभरून दाद दिली. 


प्रातिनिधीक स्वरूपात 10 लाभार्थ्यांना उपकरणे प्रदान


ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना सहाय्यक उपकरणे वितरण शिबिरामध्ये केंद्रीय मंत्री, सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात 10 लाभार्थ्यांना उपकरणे प्रदान करण्यात आली. यावेळी संदीप राम भगत यांना मोटराईज्ड ट्रायसिकल, भरत बाबुराव निमजे यांना ट्रायसिकल, चंदन बाबु लाल यांना व्हिलचेअर, सहादेव श्रीपत राउत यांना चष्मा, चंद्रभान पारवे यांना कृत्रिम दात, संतोष निताई दास यांना कृत्रिम पाय, विशाल कैलाश यांना स्मार्ट फोन, कविता विजय मती यांना सुगम्य केन, भागवत सदाशिव यांना कानाची मशीन आणि नर्मदा आत्माराम यांना कमोडसह व्हिलचेअर वितरीत करण्यात आले.


इतर बातम्या


Nagpur Miss Nation 2022: 'मिस नेशन 2022'मध्ये नागपूरच्या सिद्धी, मुस्कानचा जलवा


Nuclear medicine : बावनकुळेंची 'न्युक्लिअर मेडिसिन'ची घोषणा हवेतच विरली, अत्याधुनिक निदान पद्धतीपासून रुग्ण वंचित