• 2017 मध्ये झाली होती घोषणा




  • 25 कोटींचा निधीही देण्याची होती तयारी




  • 75 कोटीपर्यंत निधी उपलब्ध करुन देण्यात येणार होता




नागपूरः मेडिकलमध्ये 'न्युक्लिअर मेडिसिन' (Nuclear Medicine) विभाग उभारण्याची घोषणा 2017 मध्ये तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केली होती. नाविन्यपूर्ण योजनेतून निधीही देऊ केला होता. परंतु, ही घोषणा हवेतच विरली. परिणामी गंभीर आजाराच्या रुग्णांना अत्याधुनिक निदान पद्धतीपासून (Advanced diagnostic methods) वंचित रहावे लागले आहे.


न्युक्लिअर मेडिसिन वेदनारहित पद्धती असून रोगाचा शरीरावरील नेमका प्रादुर्भाव ओळखता येतो. यामुळेच टार्गेट थेरपी (Target Therapy) म्हणूनही ही पद्धती विकसित झाली आहे. कर्करोग (Cancer), हृदयविकार (Heart disease), हत्तीपाय यासह अन्य आजारांवर अचूक निदान शक्य आहे. संपूर्ण मध्यभारतातून (Central India) रुग्ण उपचारासाठी नागपुरात येतात. दरवर्षी सुमारे 20 हजार कॅन्सरग्रस्तांची (cancer patients) आणि सुपरमध्ये मोठ्या प्रमाणात ह्दयरुग्णांची नोंद होते. हत्तीरोगाचे रुग्णाही मोठ्या संख्येने आहेत.


बावनकुळेंकडून अपेक्षा


2017मध्ये भाजपचे तत्कालीन उर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकल्पाची घोषणा केली होती. सध्या ते मंत्री नसले तरी भाजपचे राज्याचे प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्याच घोषणेची अंमलबजावणी करणे त्यांच्यासाठी कठीण नाही. मात्र हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीचीच गरज आहे. त्यामुळे नागपुरकरांना त्यांच्याकडून अपेक्षा आहेत.


75 कोटींचा निधी देण्याची ग्वाही


गरिबांसाठी वरदान ठरणारा न्युक्लिअर मेडिसीन विभाग मेडिकलमध्ये (GMC) उभारण्यासाठी तत्कालीन अधिष्ठाता (Dean) डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी पुढाकार घेतला. नावीन्य योजनेअंतर्गत या विभाग स्थापन व्हावा यासाठी धडपड केली. तत्कालीन पालकमंत्री बावनकुळे यांनी या विभागासाठी 75 कोटींचा निधी देण्याची घोषणा केली होती. पहिल्या टप्प्यात 2017 मध्ये 25 कोटी मिळणार होता. मात्र 2017 ते 2019 या कालावधीत निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. 


न्युक्लिअर मेडिसिनची उपयोगिता


हत्तीरोगावरील शस्त्रक्रियेसाठी न्युक्लिअर मेडिसिन प्रभावी आहे. सोबतच हृदय, मूत्रपिंड, यकृताची कार्यक्षमता तसेच यासंबंधीच्या विविध आजारांची नेमकी माहिती कळते. वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग व त्याची अवस्था कळणेही शक्य होते. थायरॉईडच्या आजारांविषयीही न्युक्लिअर मेडिसिनमुळे माहिती कळणे शक्य होते. गॅमा कॅमेराच्या (Gamma Camera) माध्यमातून कॅन्सरचे निदान, कर्करोग किती भागात पसरला, ट्रिटमेंटला मिळणारा प्रतिसाद याबाबतची माहिती मिळते.


महत्त्वाच्या बातम्या


Green Initiative : प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी चोखपणे पार पाडावी, देशाचे वॉटरमन राजेंद्र सिंह यांचे आवाहन


MBBS Students : तीन महिन्यांपासून मानधन नाही, लता मंगेशकर रुग्णालयातील आंतरवासित डॉक्टर तीन दिवसांपासून संपावर