Maharashtra Assembly Winter Session 2022 : विधीमंडळाच्या नागूपर हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session 2022) आजचा आठवा दिवस आहे. आज देखील सभागृहात विविध मुद्यांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधकांनी केलेल्या आरोपांना काल (27 डिसेंबर) कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) उत्तर देणार होते. मात्र, सभागृहात ते काहीही बोलले नाहीत. त्यामुळं आज तरी सत्तार मौन सोडणार का? आणि विरोधकांनी केलेल्या आरोपांचं खंडण करणार का? हे पाहणं महत्वाचं ठारणार आहे. मात्र, सत्तारांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांना आक्रमक पवित्रा घेतला आहे.
विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक
दोन मुद्यावरुन सत्तारांच्या विरोधात वातावरण तापलं आहे. एक गायरान जमीन घोटळा प्रकरण आणि दुसरं सिल्लोडमधील कृषी महोत्सव. यावरुन कृषीमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत आले आहे. या दोन आरोपांवर विरोधकांनी रान उठवलं आहे. काल दिवसभरात सत्तारांनीअधिवेशनात एक चकार शब्ददेखील काढला नाही. त्यामुळं अब्दुल सत्तार आज तरी बोलणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, आज विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. तसेच अधिवेशनाच्या कालावधीचा निर्णय देखील आज होण्याची शक्यता आहे. आज विविध विषयांवर 11 मोर्चे निघणार आहेत.
अधिवेशनाचा कालावधी वाढणार का?
आज सकाळी 10 वाजता विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढण्याची मागणी केली होती. त्यांची ही मागणी मान्य होणार याकडे आता लक्ष लागलं आहे.
विधानसभेत सीमाप्रश्नी ठराव एकमताने मंजूर
महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काल सीमावादाप्रश्नी कर्नाटक सरकारविरोधातील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नाच्या ठरावाचं वाचन केलं. कर्नाटकातील मराठी भाषिक 865 गावांची इंच अन् इंच जागा महाराष्ट्राचीच असून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने आणि सर्व ताकदीनिशी उभे असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर विरोधकांकडून सातत्याने बेळगाव सीमा प्रश्नावर ठराव करण्याची मागणी करण्यात येत होती. महाराष्ट्राच्या विधानसभेने कर्नाटक प्रशासनाच्या मराठीविरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
अब्दुल सत्तारांसह संजय राठोंवर आरोप
अब्दुल सत्तारांनी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून वाशीम जिल्ह्यातील 150 कोटींची 37 एकर गायरान जमीन खासगी व्यक्तीला दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात होत असलेल्या 'सिल्लोड कृषी महोत्सवासाठी कृषी विभागात चक्क वसुली मोहीम राबवली जात असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. दुसरीकडे मंत्री संजय राठोड यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. संजय राठोड यांनी 2019 मध्ये 5 एकर गायरान जमीन खासगी व्यक्तीला देण्याचे आदेश काढले आहेत. गायरान जमिनीवरील अतिक्रमण हे नियमानुकूल करण्याची तरतूद नाही. कोर्टानेदेखील याबाबतचे आदेश वेळोवेळी दिले आहेत. संबंधित पाच एकर जागा नियमानुकूल करण्याचे आदेश तत्कालीन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी 2018 मध्ये दिलेला आदेश संजय राठोड यांनी रद्द केला होता.
महत्त्वाच्या बातम्या: