Nagpur News : नागपूर शहरातून वाहणाऱ्या ऐतिहासिक अशा नाग नदीत (Nag River) शहरातील 1.32 लाख घरातील अस्वच्छ पाणी जात आहे. परिणामी, पावसाळ्यातही या नदीचे पाणी अस्वच्छच असते. आता या नदीने एका मोठ्या नाल्याचे रुप घेतले आहे. या नदीला जुने वैभव प्राप्त करुन देण्यासाठी नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्प (Nag River Rejuvenation Project) तयार करण्यात आला होता. आता या प्रकल्पाची मुहूर्तमेढ झाली असल्याने येणाऱ्या काळात ही नदी पुन्हा जुन्या ऐतिहासिक भूमिकेत येईल, अशी आशा नागपूरकरांना आहे.


या नदीच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केंद्रात प्रस्ताव पाठवला होता. त्यासाठीची निधीचीही मागणी केली होती. आधी प्रकल्पाला तत्वत: मंजुरी मिळाली होती. निधीची तरतूद झाली होती. मात्र, प्रकल्पाला कॅबिनेटची मंजुरी मिळत नव्हती. या प्रकल्पासाठी फ्रान्सच्या कंपनीसोबत करारही करण्यात आला. कर्जाबाबतही बोलणी झाली होती. परंतु, केंद्राने दोन वेळा या पुनरुज्जीवन आराखड्यात बदल सूचवल्याने हा प्रकल्प लांबणीवर पडत गेला. नुकतेच रविवारी (11 डिसेंबर) स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नागपूरच्या दौऱ्यावर येण्यापूर्वी कॅबिनेटने या प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यानंतर प्रकल्पाची पायाभरणीही झाली. त्यामुळे आता या प्रकल्पाच्या कामाला वेग येईल, असे मानले जात आहे.


500 किमीची सीवर लाईन


या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरात जवळपास 500 किलोमीटर लांबीची सीवर लाईन टाकून जुन्या लाईनचे नुतनीकरण करण्यात येईल. या प्रकल्पासाठी एकूण 1927 कोटी खर्च अपेक्षित आहे. यात केंद्राकडून (Central Government) 1115.22 कोटी, राज्य सरकारकडून (government of maharashtra) 507.36 कोटी आणि नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation) समभाग 304.41 कोटी असेल. 


पाच वर्षाचा प्रकल्प


नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्प 5 वर्षात पूर्ण करण्याची योजना आहे. मात्र, हा प्रकल्प कधी सुरू होईल, याबाबत अद्यापही संभ्रम आहे. नदीत सोडलं जाणारं दूषित पाणी सर्वप्रथम बंद करणे आवश्यक आहे. त्यासाठी एसटीपी लावले जाणार आहे. या पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते पुन्हा सोडले जाईल. शहरातील स्वच्छतागृहाचे कामही याच योजनेअंतर्गत होणार आहे. 


बोट चालणार का?


नागपूरकरांना सर्वाधिक उत्सुकता या नदीत चालणाऱ्या बोटींबाबत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ते स्वप्न आहे. या नदीत पारडीपर्यंत बोट चालवण्याचा त्यांचा मानस आहे. शिवाय, नदीच्या काठावर सौंदर्यीकरण, चौपाटी आदीही तयार केली जाणार आहे. या प्रकल्पास मंजुरी मिळाल्यानंतर मनपाकडून या कामास सुरुवात होईल. याकडे नागपूरकरांचे लक्ष राहणार आहे. शिवाय, या प्रकल्पांतर्गत नदी काठावर वसलेल्या अनेक घरांना स्थानांतरित करण्याची प्रक्रियाही केली जाणार आहे.


ही बातमी देखील वाचा


Winter Assembly Session : विधिमंडळ कार्यालय उद्यापासून पूर्ण क्षमतेने होणार सुरु; काही कर्मचारीही दाखल