Nagpur News : आठवडाभरावर आलेल्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनासाठी (Winter Assembly Session) विधिमंडळामधील कार्यालयांच्या तयारीलाही सुरुवात झाली आहे. उद्या, सोमवार,12 डिसेंबरपासून पूर्ण क्षमतेने ते सुरू होईल. अधिवेशनासाठी दोन दिवसांपूर्वीच मुंबईहून काही साहित्य नागपूरच्या दिशेने निघाले होते. सध्या त्याची सचिवालयात त्याची मांडणी सुरु असल्याची अशी माहिती विधिमंडळातील सूत्रांनी दिली.
19 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. तब्बल दोन वर्षानंतर म्हणजे कोरोनानंतरचे हे अधिवेशन आहे. यादरम्यान राज्यात सत्तांतर झाले. त्यामुळे या अधिवेशनात अनेक राजकिय घडामोडी घडतील, असे संकेत आहेत. त्यादृष्टीने डावपेच आखण्याचे काम सुरू आहे. तुर्तास दोन आठवड्यांचे कामकाज संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले आहे. 29 डिसेंबरपर्यंतच्या कामकाजाच्या नियोजनावर समितीने दोन दिवसांपूर्वी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे अधिवेशन विरोधकांनी मागणी केली तरी नव्या वर्षात खेचले जाईल, अशी शक्यता कमीच आहे.
कामकाजाचा पहिला आठवडा हा अनेक वादग्रस्त प्रकरणं आणि राज्यातील महत्वाच्या प्रश्नावर चर्चांवर जाईल. त्यामुळे पहिला आठवडा हा कामकाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरणारा असेल. तर, दुसऱ्या आठवड्यात अधिकाधिक शासकीय कामकाज असेल. त्यामुळे पहिला आठवडा सभागृहात (Vidhan Bhavan) आणि बाहेर देखील लक्षवेधी असेल. अधिवेशनाचा पहिला दिवस हा सभागृहातील निधन झालेल्या सन्माननीय सदस्यांना श्रध्दांजली वाहण्यात जाईल. दुसऱ्या दिवसापासून कामकाजास सुरूवात होईल. दरम्यान, अधिवेशनासाठी मुंबई विधानभवनातून साहित्य घेऊन ट्रक नागपूरच्या दिशेने निघाले आहेत. यात विधिमंडळ ग्रंथालयातील ग्रंथसंपदा व पुस्तकांचा समावेश आहे. शिवाय, विधीमंडळातील विविध शाखेतील कागदपत्रे व फाईल्सचा समावेश आहे. आज, रविवारी काही कर्मचारी नागपुरात दाखल झाले. तर सोमवार, 12 डिसेंबरला बऱ्यापैकी कर्मचारीवर्ग नागपुरात दाखल होऊन कामकाजास प्रत्यक्ष सुरूवात होईल.
अतिवृष्टी मदत आणि राज्यपालांचं वक्तव्यावरुन गोंधळाची शक्यता
गेल्या काही महिन्यात राज्यातील अनेक जिल्हयात अतिवृष्टी झाली. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. विरोधकांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची सातत्याने मागणी केली. मात्र, सरकारकडून म्हणावी अशी मदत मिळालेली नाही. यावरुन विरोधक आक्रमक होण्याची चिन्हं आहेत. महत्वाचे म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काढलेल्या वक्तव्याने अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. आंदोलने आणि त्यांना परत पाठविण्याची मागणी झाल्यावरही अद्याप केंद्राकडून त्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे हा मुद्दाही अधिवेशनात केंद्रस्थानी असेल. शिवाय, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरुन देखील विरोधक सत्तापक्षाला घेरण्याची शक्यता आहे.
मंत्रीमंडळ विस्तार नाही?
गुवाहाटीतील कामाख्य मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर राज्यातील शिंदे गटाने मंत्रीमंडळ विस्ताराचे संकेत दिले होते. मुख्यमंत्र्यांनी तशी दिल्लीवारीही केली होती. परंतु, विस्ताराबाबत कुठलीही हालचाल नाही. नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे.
ही बातमी देखील वाचा