Nagpur News : वैदर्भीयांसाठीच (Vidarbha) नव्हे तर राज्यातील जनतेसाठी बहप्रतिक्षीत असे नागपुरातील हिवाळी अधिवेशन (Winter Assembly Session) आठवड्याभरातच गुंडाळणार असल्याचे संकेत आहेत. 19 डिसेंबरपासून अधिवेशनास सुरुवात होईल. तर 29 डिसेंबरपर्यंतचे कामकाज ठरले आहे. या कालावधीत मोजून 7 दिवसाचेच कामकाज आहे. नववर्ष सेलीब्रेशनचे (New Year Celebration) वेध असल्याने तसेही आमदारांना मतदारसंघात परत जायचे आहे. त्यामुळे वादळी ठरण्याचे संकेत असले तरी महत्त्वाच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घेऊन राज्य सरकार विरोधकांवरच त्यांचा डाव उलटवण्याच्या तयारीत आहे.


राज्यात सत्तापालट झाल्याने खऱ्या अर्थाने सरकारची परीक्षा घेणारे हे अधिवेशन असेल. त्यामुळे दोन्ही बाजूने या अधिवेशनात चांगलीच घमासान होण्याचे चिन्हे आहेत. यासाठी विरोधकांप्रमाणेच राज्य सरकारने व्यूहरचना आखली आहे. ज्या मुद्यावर विरोधकांनी सरकारला घेरण्याचे ठरवले आहे, त्या महत्त्वाच्या मुद्यांबाबत अनपेक्षितपणे निर्णय जाहीर करुन विरोधकांना तोंडावर पाडण्याचा प्रयत्न आहे. दुसरीकडे विरोधकांनी जे मुद्दे पुढे केले आहेत, त्यापेक्षाही नवे प्रश्न आणि मुद्दे पुढे करुन सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी करणार आहे. शनिवार, 17 डिसेंबरला मविआतर्फे काढण्यात येणारा महामोर्चा हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे सरकार आणि विरोधक असा सामना नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात बघायला मिळेल.
 
पहिल्या आठवड्यात मोजून चारच दिवसांचे कामकाज होईल. यात अनेक महत्त्वाच्या आणि वादग्रस्त बाबींबद्दल गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गदारोळातच सरकार काही शासकीय कामकाज, विधेयके आणि निर्णय उरकून टाकतील. दुसऱ्या आठवड्यात कामकाजासाठी तीनच दिवस मिळेल. यात अधिकाधिक शासकीय कामकाज आटोपते घेतील. या दोन्ही आठवड्यातील 7 दिवस कामकाज होईल. तेवढयाच कालावधीत राज्य सरकार (Government of Maharashtra) महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारच्या निर्णयाचेही उट्टे काढण्याचा प्रयत्न करतील. यासाठी शिंदे गट आणि भाजपने तयारी केली आहे. विरोधकांनीही जशास तसे उत्तर देण्याची तयारी चालवली आहे.


नववर्षामुळे अडचण?


सरकारमधील अनेक आमदारांना नववर्ष सेलिब्रेशनची चिंता आहे. आगामी काळात राज्यात मनपा निवडणुका असल्याने आमदारांना (MLA) या सेलिब्रेशनचे मोठे महत्त्व आहे. कोरोनामुळे नववर्ष तेवढ्या जोमात साजरा करता आले नाही. आता सर्वत्र मोकळे रान असल्याने तसेच राज्यात सत्ता आल्याने सत्तापक्षातील आमदारांमध्ये नवी ऊर्जा आली आहे. त्यामुळेच दोन आठवड्यापेक्षा जास्त अधिवेशन वाढवू नये, असा दबावही वाढत आहे.


सचिवालयाच्या कामकाजाला सुरुवात


विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशनासाठी सचिवालयाच्या (Secretariat) कामकाजास सुरुवात झाली आहे. सोमवार, 19 डिसेंबरपासून अधिवेशनास सुरुवात होईल. तूर्तास, संसदीय कामकाज सल्लागार समितीने गुरुवार, 29 डिसेंबरपर्यंतचं कामकाज निश्चित केले आहे. सचिवालयात सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी साहित्यासह दाखल झाले आहेत. विधीमंडळ सुरक्षा यंत्रणेने विधानभवनाचा ताबा घेतला आहे. मुंबईहून आलेला कर्मचारीवर्ग मंगळवारी कक्षातील साहित्य कपाटात लावण्यात व्यस्त दिसत होते.


ही बातमी देखील वाचा


साई भक्तांसाठी एसटी महामंडळाची भेट; समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी 'नॉनस्टॉप' बससेवा, 'या' सवलतीही मिळणार