नागपूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या (Ganesh Chaturthi) अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेने स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यासाठी मनपा सभागृहात बैठक घेतली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त आयुक्त राम जोशी होते. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे (Department of Solid Waste Management) उपायुक्त व संचालक डॉ. गजेंद्र महल्ले उपस्थित होते.


नागपूर शहरात 4 फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी एकूण 350 कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार असल्याचे डॉ. गजेंद्र महल्ले यांनी बैठकीत सांगितले.  पर्यावरणपूरक गणेश विसर्जन आणि निर्माल्य संकलनासाठी मनपाला मदत करण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांनी विविध विसर्जनस्थळी उपस्थित राहण्याचे मान्य केले. ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन फुटाळा तलाव (Futala Lake) येथील एअरफोर्स (Airforce) बाजूने उपस्थित राहणार आहे. तसेच सक्करदरा (Sakkardara Lake) तलावातील किंग कोब्रा ऑर्गनायझेशन, रामनगरमधील इको-फ्रेंडली फाऊंडेशन, सोनेगाव येथील सीएसएफडी, एम्प्रेस मिल (Empress Mills) येथील तेजस्विनी महिला मंडळ, सोनेगाव तलावातील ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन आणि गांधीसागर तलावातील निसर्ग विज्ञान आदी संस्था उपस्थित राहणार आहेत.


बैठकीत सर्व 10 झोनच्या झोनल अधिकाऱ्यांनी आपापल्या झोनमध्ये कृत्रिम तलाव निर्माण करण्याबाबत माहिती दिली.  मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी सर्व स्वयंसेवी संस्थांनी पुढे येऊन मनपाला सर्व सहकार्य करण्याचे आवाहन केले. बैठकीला कौस्तभ चटर्जी, सुरभी जैस्वाल, अरविंद कुमार रातोडी, अनुसया छबरणी, विजय घुगे, विजय लिमये, मेहुल कोसुरकर, किरण मुंद्रा, अतुल पिंपळेकर आदी विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


मूर्ती खरेदी करतांना खात्री करून घ्या


नागरीकांनी दुकानदार, व्यावसायिक यांच्या कडुन श्री गणेशाची मुर्ती खरेदी करतांना श्री गणेशाची मुर्ती संपुर्ण मातीची किंवा शाडु मातीची असेल अशी खात्री करूनच मुर्तीची खरेदी करून घ्यावी. पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचीच स्थापना घरोघरी करण्यात यावी, असे नागपूर महानरपालिकेद्वारे जाहिर आवाहन करण्यात येत आहे.


कृत्रिम तलावात करा विसर्जन


प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या गणपती मुर्तींना नैसर्गिक पाण्याच्या नदी-तलावसाख्या स्त्रोतांमध्ये विर्सजित करण्यात येवू नये. घरगुती गणपती तसेच सार्वजनिक मंडळाच्या गणपतींना कृत्रिम तलाव किंवा घरगुती टँकमध्ये विर्सजित करण्यात यावे. तालुकास्तरावर नगरपरिषद व महसूल विभागाने पडीक जमीन तसेच बंद झालेल्या खाणी याठिकाणांची माहिती गोळा करुन कृत्रिम तलावांच्या निर्मितीसाठी नियोजन करावे. विर्सजनाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सोयी-सुविधा उभारण्यात याव्यात. उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाने प्रतिबंधात्मक नियमांनुसार कारवाया कराव्या. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी व गर्दीच्या व्यवस्थापनासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा. शांततामय वातावरणात उत्सव साजरा होण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाच्या उपाययोजनांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले.


इतर महत्त्वाच्या बातम्या


RTMNU Exams : पोळ्याच्या पाडाव्यानिमित्त नागपूर विद्यापीठाच्या शनिवारी होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द, परीक्षेचे वेळापत्र नंतर करणार जाहीर


इकोफ्रेंडली मूर्तीची स्थापना करून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा, मनपाचे आवाहन