नागपूरः परीक्षा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पुन्हा एकदा नागपूर विद्यापीठाच्या उद्या, 27 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. विद्यापीठाने जारी केलेल्या परिपत्रकात पोळ्याच्या पाडाव्याचे कारण परीक्षा रद्द करण्यसााठी सांगण्यात आले आहे. यापूर्वी रद्द करण्यात आलेले पेपर 27 ऑगस्टला होणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले होते. मात्र पोळा आणि पाडवा हे आधीच माहिती असतानाही तारखेचे नियोजन न करता निर्णय घेण्यात आल्यामुळे पुन्हा परीक्षा रद्द करण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे. मात्र विद्यापीठाच्या या नियोजनशून्य कारभारामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
यापूर्वी 16 ऑगस्ट रोजी नागपूर विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे तिन्ही सत्रात होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच याच्या पूर्वीही सुमारे 114 परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच रद्द करण्यात आलेले पेपर 16 आणि 21 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होते.
10 ऑगस्टरोजी घेण्यात येणार होता पेपर
अतिवृष्टीमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या होणाऱ्या 10 ऑगस्ट रोजीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्या रद्द झालेल्या परीक्षा 27 ऑगस्ट रोजी करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र ग्रामीण भागातील प्राचार्य आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधीच्या मागणीनुसार कुलगुरुंच्या आदेशानुसार 27 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रद्द करण्यात आलेल्या परीक्षेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येतील असे परीपत्रकात सांगितले आहे.
नियोजनशून्य कारभार
यापूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे परीक्षा रद्द करुन त्या पुढे ढकलल्या होत्या. या घटनेला महिनाही झालेला नाही. पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली. अतिवृष्टी झाली व प्रशासनाने पूर परिस्थिती असल्याचे जाहीर केले. यानंतर विद्यापीठाने दूरस्थ भागात असलेल्या विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्याच्या दृष्टीने निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांनी फोन करून माहिती व महाविद्यालयांकडून विनंती करण्यात यावी याची वाट पाहिली. परीक्षा विभागात नियोजनाचा अभाव असल्यानेच वेळेवर पेपर रद्द करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
येथे साधा संपर्क
परीक्षांसंदर्भात काही अडचणी असल्यास तर विद्यार्थ्यांनी 8421464216, 8999567428, 9890007313, 9022877472 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.
इतर बातम्या