नागपूर : नागपूरच्या गिल्लूरकर मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये भारत बायोटेक निर्मित कोवॅक्सिनची मानवी चाचणी सुरु झाली आहे. डॉ चंद्रशेखर गिल्लूरकर यांच्या देखरेखीत आरोग्य तपासणीतून निवडलेल्या स्वयंसेवकांना ही लस दिली जात आहे. ज्या स्वयंसेवकाना ही कोवॅक्सिन ही देण्यात आली आहे तेही या प्रक्रियेत सहभागी होऊन आनंदित आहेत. आम्ही देशाच्या कामी येत आहोत, एका सैनिकासारखे वाटत असल्याची भावना या स्वयंसेवकांनी व्यक्त केली आहे.
नागपुरात काल (27 जुलै) संध्याकाळी तिघांना लस देण्यात आली असून आज आणखी पाच जणांना कोवॅक्सिन ही लस दिली जाणार आहे. काल ज्यांना लस दिली त्यांच्यावर कोणतेही दुष्परिणाम झालेले दिसले नाहीत. त्यामुळे उत्साह वाढल्याचे डॉक्टरांचं म्हणणं आहे.
या चाचणीत सहभागी झालेले दोन स्वयंसेवक एबीपी माझाशी संवाद साधताना म्हणाले की, "सखोल आरोग्य चाचणीतून या बहुप्रतिक्षित कोवॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीसाठी आमची निवड झाल्यामुळे आनंद होत आहे. देशाच्या कामी येत आहोत, एका सैनिकासारखे वाटत आहे. भारताचा सैनिक देशासाठी काय करतो अशीच भावना आज मनात आहे. तसंच आम्हाला कोणतंही खास पथ्य पाळण्यास सांगितलेलं नाही. त्यामुळे आम्ही सामान्य आयुष्य जगू शकतो आहे. केवळ कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सांगितलेले नियम पाळायचे आहेत."
आता दर 14 दिवसांनी लस दिलेल्या स्वयंसेवकांची ब्लड टेस्ट आणि इतर चाचण्या केल्या जाणार आहेत. सहा महिन्यांच्या कालावधीच एकूण पाच वेळा ही चाचणी होणार आहे.
पहिल्या टप्प्यात नागपुरात 30 ते 40 जणांना आणि देशभर 375 जणांना लस दिली जाणार आहे. नागपूरआधी दिल्लीतील एम्स, हैदराबादच्या निजाम इन्स्टिट्यूट आणि चंदीगडच्या पीजीआय या ठिकाणी लसीची मानवी चाचणी सुरु झाली आहे.
जगातील इतर ठिकाणी खासकरुन ऑक्सफर्डची लस तिसऱ्या टप्प्यात असल्याने प्रक्रियेत भारतीय लसीच्या पुढे आहे. मात्र येणाऱ्या काही महिन्यात भारतीय लस कोवॅक्सिन चांगली बातमी देईल, असा विश्वास डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या
भारतातील पहिली कोविड-19 लस 'Covaxin'च्या मानवी चाचणीला परवानगी; जुलैपासून ट्रायल सुरु
गूड न्यूज... कोरोनावरील भारतात बनलेली लस कोवाक्सिन 15 ऑगस्टपर्यंत लॉन्च होण्याची शक्यता