नागपूर: गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस (Rain) बरसला आहे. याच गोष्टीचा अनुभव गुरुवारी नागपूरकरांनी घेतला. नागपूरमध्ये (Nagpur) काल सकाळी अक्षरश: पावसाळी ऋतू वाटावा, असे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर दिवसभर नागपूरमध्ये विविध ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. 


नागपुरात गुरुवारी सकाळी अर्धा तास दमदार पाऊस पडला. हवामान विभागाच्या सकाळी साडेअकरा वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार नागपुरात 47 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. काल सकाळी नागपूरकर जेव्हा जागे झाले तेव्हा निरभ्र आकाश आणि चांगले कडकडीत ऊन होते. मात्र, नऊ वाजता अचानकच वातावरण बदललं आणि काळ्या ढगांनी नागपूरचा आकाश व्यापून टाकले. त्यामुळे साडेनऊ वाजता नागपुरात संध्याकाळ व्हावी, असा अंधार पसरला होता. यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. तब्बल तासभर जोरदार पाऊस झाला.


सकाळी सव्वानऊ वाजल्यापासून सुमारे एक तास नागपुरातील वेगवेगळ्या भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला.  काही ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून खाली उभ्या असलेल्या दुचाकी आणि वाहनांचा नुकसान झाल्याची ही माहिती आहे. दरम्यान हवामान विभागाने येत्या काही तासांमध्ये पुन्हा नागपुरात मुसळधार पाऊस होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नागपूरमध्ये काल सकाळपासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत 50.2 मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. मे महिन्यात गेल्या 58 वर्षातला हा एका दिवसातील सर्वाधिक पाऊस आहे.


भंडाऱ्यात अवकाळीनं हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडातील घास


गेल्या तीन दिवसात भंडारा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अनेकांच्या शेतातील भातपीकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेकांनी धान मळणीसाठी धान कळपा शेतात कापून ठेवलेल्या असताना त्या अवकाळी पावसात सापडल्यानं आता पाण्याखाली आल्या आहेत. यामुळं धानाची नासाडी होण्याची भीती आहे. तर, काही ठिकाणी कापणीला आलेले भात पीक जोरदार वारा आणि पावसात सापडल्यानं जमीनदोस्त झालेलं आहे. अगदी काही दिवसात निघालेल्या भात पिकाची विक्री करून स्वतःवर असलेलं कर्ज फेडण्याचं स्वप्न बघत असतानाच आलेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेराल्यानं भंडारा जिल्ह्यातील शेतकरी पुरता हतबल झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे.


आणखी वाचा


महाराष्ट्रात मान्सूनची चाहूल! येत्या 24 तासात मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज


पुण्यात मुसळधार, मराठवाड्यात अवकाळी पावसाच्या सरी, वाशिमध्ये वीज कोसळून 1 ठार