Nagpur Rain News : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठं उष्णतेची लाट आहे तर कुठं ढगाळ वातावरण आहे. तर काही भागात पावसानं (Rain) देखील हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नागपूरमध्ये सकाळी जोरदार पावसानं (Nagpur Rain) हजेरी लावली. तासाभरात नागपूरमध्ये 47 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पुढील तीन तासात पुन्हा नागपुरात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट
आज सकाळी नागपूरकर जेव्हा जागे झाले तेव्हा निरभ्र आकाश आणि चांगलं ऊन होतं. मात्र, नऊ वाजता अचानकच वातावरणात बदल झाला. काळ्या ढगांनी नागपूरचा आकाश व्यापून टाकलां. त्यामुळं साडेनऊ वाजता नागपुरात संध्याकाळ व्हावी असा अंधार पसरला होता. सव्वानऊ वाजल्यापासून सुमारे एक तास नागपुरातील वेगवेगळ्या भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे. तर काही ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून खाली पडल्या आहेत. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या वाहनांवर पडल्या आहेत. त्यामुळं वाहनांचं नुकसान झाल्याची माहिती आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील तीन तासात पुन्हा नागपुरात मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली आहे. नागपुरात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
एक दिवसाच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात पुन्हा दमदार पाऊस
मंगळवारी आलेल्या दमदार अवकाळी पावसानंतर एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा भंडाऱ्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. सकाळपासून मेघ दाटून आल्यानं सर्वत्र काळोख पसरला आहे. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं जिल्ह्यात हजेरी लावली. दोन दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी जोरदार पावसाचा जिल्ह्यातील 157 गावातील 1519.50 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनानं तयार केला आहे. त्यानंतर आजच्या पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. वीज कोसळण्याची शक्यता हवामन विभागानं वर्तवली असल्यानं नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
राज्यात 9 मे ते 15 मे दरम्यान जोरदार पावसाची (Rain) शक्यता
राज्यात आजपासून म्हणजे 9 मे ते 15 मे दरम्यान जोरदार पावसाची (Rain) शक्यता असल्याची माहिती हवामान अभ्यासक विजय जायभावे (Vijay Jaibhave) यांनी दिली आहे. आजही राज्याच्या विविध भागात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा विभागात जोरदार वळिव पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
देशातील बहुतांश भागात तापमानाचा पारा वाढला
सध्या देशातील बहुतांश भागात तापमानाचा पारा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तापमान हे 40 अंशाच्या पुढे गेल्याचे दिसत आहे. वाढतं तापमान हा चिंतेचा विषय आहे. यामुळं नागरिकांच्या अंगाची काहीली होत आहे. दरम्या, या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कामाव्यतिरीक्त दुपारच्या वेळेस घराच्या बाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. नागरिकांनी या काळात योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
दिलासादायक! 9 ते 15 मे दरम्यान राज्यात जोरदार पावसाचा इशारा, कोणत्या भागात कधी होणार पाऊस?