छत्रपती संभाजीनगर : राज्यातील कोकण वगळता इतर विभागातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाचे (Rain) आगमन झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, आज 9 मे रोजी मराठवाड्यसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार पुणे, संभाजीनगर, हिंगोली,वाशिम, यवतमाळ (yavatmal) या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. यावेळी सोसाट्याचा वाराही वाहताना पाहायला मिळाला. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून अनेक भागांत पावसाचे आगमन झाले आहे.  पुण्यातील सिंहगड रोडवरही जोरदार धारा कोसळल्याचं पाहायला मिळाल. नांदेड सिटी, धायरी, बावधन, कात्रजघाट हायवे मार्गावर मुसळधार पाऊस झाला. तर, आंबेगात ते सिंहगड रोडवर 


हवामान खात्याने सांगितलेल्या अंदाजानुसार कालपासूनच यवतमाळ जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. तर दुपारच्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, दारव्हा, दिग्रस, पुसद, महागाव, नेर या तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्याचे तापमान हे 42.5 अंशांवर गेले असता अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या खरीप हंगामातील मशागतीच्या कामाला लागला असल्याने या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे पालेभाज्या आणि फळबागांचे नुकसानही होत आहे. 


चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातही आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. सलग दोन दिवस चंद्रपुरात मुसळधार पाऊस अनुभवला जात आहे. गेला महिनाभर चंद्रपूरकर लाही-लाही करणारे ऊन अनुभवत होते. त्यावेळी, पारा 44.2 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचला असताना गेले दोन दिवस सलग पडणाऱ्या पावसाने चंद्रपूरकरांना काहीसा दिलासा मिळाला. आजच्या पावसामुळे चंद्रपूर शहरातील बिनबा गेट ते आंबेडकर पुतळा मार्गावर पाणी देखील जमा झाले होते.


वाशीम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी  वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, वीज कोसळून एकजण ठार


वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील विजेच्या कडकडाटासह  वादळी वाऱ्यानेने पावसाने हजेरी लावली. या  दरम्यान जांब गावात एका 14 वर्षीय दुर्गा कांबळे नामक बालिकेचा वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुसरी बालिका रविना सुर्वे ही गंभीर जखमी झाली आहे. घरासमोरील ओट्यावर खेळत असतांना अंगावर वीज कोसळल्याची घटना घडली याघटनेत जखमी मुलीला मंगरूळपीर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.






हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज हिंगोली जिल्ह्यांमध्येही वादळी वारे आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील हिंगोली आणि कळमनुरी शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाचे आगमन झाले. या पावसामुळे शेतातील भाजीपाला, पीके आणि फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा हा पाऊस आहे. 


या भागात पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट


हवामान विभागाने आज नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, औरंगाबाद या भागात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तर सातारा, कोल्हापूर, जळगाव नंदुरबार, धुळे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्याला आज पाऊस आणि गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.