नागपूरः अत्यवस्थ अवस्थेत मेडिकलमध्ये (GMC) आलेल्या तरुणीला व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले गेले नाही. व्हेंटिलेटरच्या (no ventilator) प्रतीक्षेतच तरुणीने जीव सोडला. कुटुंबियांनी तब्बल 35 ते 40 तास अ‍ॅम्बु बॅगव्दारे ऑक्सिजन देत तिला जगविण्याचा प्रयत्न केला. पण, प्रशासनाकडून योग्य सहकार्यच न मिळाल्याने कुटुंबीयांचेही प्रयत्न अपयशी ठरले. प्रशासकीय अनास्थेमुळे मेडिकलच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. घटनेची गांभीर्याने दखल घेत मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे. समितीच्या अहवालानंतरच पुढील कारवाईसंदर्भात निर्णय घेतला जाईल.


यवतमाळच्या (Wani, Yavatmal) वणी येथील वैष्णवी राजू बागेश्वर या 17 वर्षीय तरुणीला बुधवारी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. वार्ड क्रमांक 48 मध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. अत्यवस्थ असल्याने व्हेंटिलेटरची गरज होती. पण, कुटुंबीयांना सातत्याने व्हेंटिलेटरच उपलब्ध नसल्याचे सांगितले जात होते. आई- वडिलांनी अ‍ॅम्बु बॅगव्दारे ऑक्सिजन देत तिला जवळपास 40 तास जगविले. पण, या काळातही व्हेंटिलेटर उपलब्ध करून देता आले नाही. याच अवस्थेत शुक्रवारी सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला होता. गरिबांसाठी आशेचा किरण असलेल्या मेडिकलच्या (Govt Medical College, Nagpur) कारभारावर या घटनेनंतर सर्वसामान्यांकडून रोष व्यक्त केला जाऊ लागला. त्याची दखल घेऊन चौकशी समिती स्थापन केली गेली. पण, मृत्यूनंतर दाखविलेली तत्परता प्रशासनाला तिच्या मृत्युपूर्वी का दाखविता येऊ शकली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


मंगळवारपर्यंत अहवाल येण्याची शक्यता


वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी शल्यचिकीत्सा विभागातील प्राध्यापक डॉ. ब्रिजेश गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली तडकाफडकी चौकशी समिती (Inquiry Committee) स्थापन करण्यात आली. या समितीत वैद्यकीय अधिक्षक डॉ. शरद कुचेवार, मेडिसीन विभागाचे प्रा. डॉ. मिलींद व्यवहारे, बधिरीकरण विभागातील प्राध्यापक डॉ. वासुदेव बारसागडे व मेट्रन वैशाली तायडे यांचा समावेश आहे. सोमवारीच समितीची पहिली बैठक होणार आहे. मंगळवारपर्यंत समितीला चौकशी अहवाल अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्याकडे सादर करायचा आहे.


मेडिकलमध्ये 221 व्हेंटिलेटर


मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार मेडिकलमध्ये 221 व्हेंटिलेटर असून यातील 196 सुरु आहेत. तरीही वैष्णवीला व्हेंटिलेटर उपलब्ध झाले नाही. त्यावेळी या सर्व व्हेंटिलेटरवर रुग्ण होते का, याची चौकशीही समितीतर्फे करण्यात येणार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या


मी देवेंद्र 'शेट्टी' फडणवीस, मला शेट्टी आडनाव लावायला आवडेल, त्यामुळे दोन-चार हॉटेल तरी नावावर होतील: देवेंद्र फडणवीस


पतपेढीत काम करणाऱ्या महिला क्लर्कनेच केलं 13 लाखाचं सोनं लंपास, डोंबिवलीतील धक्कादायक घटना