मुंबई: बंट समाजाच्या कार्यक्रमात आतापर्यंत मी अनेकवेळा आलो आहे, त्यामुळे मला देवेंद्र शेट्टी फडणवीस म्हटलं जातंय असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis On Shetty Community) यांनी म्हटलं आहे. मला शेट्टी आडनाव लावायला आवडेल, त्यामुळे मुंबईतील दोन-चार हॉटेल तरी नावावर होतील असंही ते गमतीने म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. कुर्ला येथे विश्व बंट संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.
बंट समाज सर्व आघाड्यांमध्ये पुढे आहे, हा समाज जिथे जाईल तिथे साखरेप्रमाणे मिसळतो, महाराष्ट्रात येऊन त्यांनी गोडवा वाढवला आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "गोपाळ शेट्टी यांच्यासारखे व्यक्ती राजकारणात देखील यशस्वी झाले आहेत. बंट समाजाचे अतिशय कमी मतदान असतानाही गोपाळ शेट्टी मुंबईतून निवडून येतात. समाजात जे लोक मागे आहेत त्यांना हात देऊन पुढे करण्याचे काम बंट समाजाच्या वतीने होत आहे. समाजाला जेव्हा गरज पडेल तेव्हा सरकार तुमच्यासोबत आहे. तुमची जेव्हा प्रगती होते तेव्हा आपल्या राज्याची आणि देशाचीही प्रगती होते."
भाजप खासदार गोपाळ शेट्टी यावेळी बोलताना म्हणाले की, "राज्यात दोन ठिकाणी दसरा मेळावा होतो ही चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर मी बोलणार नाही. वेदांत प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यांचे भाषण सर्वांनी ऐकावे. वेदांता का गुजरातला गेलं हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला आहे. हे भाषण ऐकून तरी विरोधकांचे डोकं ठिकाणावर आलं पाहिजे."
वाघ वाघ असतो हे उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य बरोबर आहे, सर्व प्राण्यांची सेवा केली पाहिजे हे मोदीजी यांनी दाखवून दिलं आहे असा टोलाही भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी हाणला.