नागपूर : कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना आरोग्य विभाग आणि महापालिकेच्या यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येऊ लागला आहे. रोज एकापेक्षा एक धक्कादायक प्रसंग समोर येत असताना सर्वात ताजं आणि दुर्दैवी प्रसंग नागपूरच्या शेटे कुटुंबियांसोबत घडला आहे. जेव्हा त्यांच्या नातेवाईकांच्या मृत्यूच्या दुःखात त्यांना मृत व्यक्तीचा मृतदेह शोधण्याची वेळ आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शंकरराव यांच्या मुलीने वडिलांचा चेहरा पाहण्याचा हट्ट धरला आणि जेव्हा मृतदेहावरुन प्लास्टिकचे आवरण हटवण्यात आलं. तेव्हा आतील मृतदेह वृद्धाचा नसून एका वेगळ्याच महिलेचा असल्याचे उघड झाले.


नागपूरच्या शंकरराव शेटे (वय 63 वर्ष) यांचे काल (रविवार) कोरोनामुळे मृत्यू झाला. वानाडोंगरी येथील लता मंगेशकर रुग्णालयात कोरोनावर 10 दिवस उपचार घेतल्यानंतर काल मृत्यू झालेल्या शंकरराव यांच्या कुटुंबियांनी त्यांचे मृतदेहावर गंगाबाई घाट स्मशान भूमीवर अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. त्यानंतर महापालिकेच्या चमूने त्यांचा मृतदेह स्मशान भूमीवर आणला. शंकरराव यांच्या मुलीने वडिलांच्या आठवणींमुळे गहिवरून एकदा वडिलांचा चेहरा दाखवण्याची विनंती केली. त्यानंतर प्लास्टिकच्या आवरणात गुंडाळलेल्या मृतदेहाच्या चेहऱ्यावरून प्लास्टिक बाजूला करण्यात आले. तेव्हा तो मृतदेह शंकरराव यांचा नसून एका महिलेचा असल्याचे समोर आले. त्यानंतर शंकर राव शेटे यांच्या कुटुंबियांनी आक्षेप नोंदवात आरोग्य विभाग आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरत शंकरराव यांचा मृतदेह कुठे आहे अशी विचारणा केली.


ऑक्सिजन पुरवठ्यात 50 टक्के घट; पुढील दोन महिने अधिक जिकिरीचे


महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शोध सुरू केल्यावर त्याचवेळी मोक्षधाम या दुसऱ्या स्मशान भूमीवरही असाच गोंधळ असल्याचे कळले. त्या ठिकाणी एका महिलेच्या मृतदेह ऐवजी एका पुरुषाचा मृतदेह पोहोचल्याचे समजले आणि सर्व गौडबंगाल उघडकीस आले. महापालिका आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यांची चूक लक्षात आली. त्यांनी मोक्षधामला गेलेला शंकरराव शेटे यांचे मृतदेह गंगाबाई घाटावर आणले आणि तिथून महिलेचे मृतदेह मोक्षधाम वर नेला. रात्री उशिरा दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.


कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी


मृतदेह गुंडाळलेल्या प्लास्टिकच्या आवरणावर मृतकाच्या नावाचे लेबल लावले जातात आणि त्यावरूनच कोणते मृतदेह कोणत्या भागात आणि कोणत्या स्मशान भूमीवर न्यायचे आहे हे निश्चित होते. नागपूरच्या या प्रकरणात लेबल लावताना चूक झाल्याने मृतदेह अदला बदली झाल्याने दोन्ही कुटुंबियांना नाहक मनस्ताप सहन करावे लागला. या प्रकरणात शंकरराव शेटे यांचे नातेवाईक आणि माजी नगरसेवक प्रेमलाल बांदक्कर यांनी चौकशीची मागणी करत दुःखाच्या प्रसंगी असंवेदनशीलता दाखवत मृतदेह अदलाबदली होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.


नागपूर शासकीय वैद्यकीय हॉस्पिटलची ऑक्सिजन लाईन तुटली; भाजप आमदार प्रवीण दटके यांचा आरोप