Devendra Fandanvis on Sambhaji Bhjide : 'कोणत्याही परिस्थितीमध्ये महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा अपमान सहन केला जाणार नाही', असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यभर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. अनेक ठिकाणी भिडे गुरुजींच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. तसेच भिडे गुरुजींनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया उमटत आहेत. 


यासंदर्भात योग्य कारवाई करण्यात येईल : देवेंद्र फडणवीस 


यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, 'महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे महानायक आहेत, त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे.' तसेच भिडे गुरुजी आणि इतर कोणीही अशाप्रकारचे वक्तव्य करु नये असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे जनतेमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचं देखील यावेळी फडणवीसांनी म्हटलं आहे. त्यामुळे लोकांना अशा प्रकराचं वक्तव्य सहन होणार नसल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच या संदर्भात उचित कारवाई करण्यात येईल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. 


'जाणीवपूर्वक या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न' 


संभाजी भिडे यांचा भाजपशी काहीही संबंध नाही त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, 'जसं काँग्रेस याबाबत रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत त्याचप्रमाणे जेव्हा राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं तेव्हा देखील त्यांनी आंदोलन करायला हवं होतं.' मात्र तेव्हा काँग्रेसचे लोक मिंधे होऊन बसले होते, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लगावला आहे. तसेच कोणाहीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य सहन केलं जाणार नाही मग ते महात्मा गांधी असो किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 


संभाजी भिडे काय म्हणाले होते?


संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांचे वडिल मुस्लीम होते असं वक्तव्य केलं आहे. त्यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यभरात आंदोलनं केली जात आहेत. तसेच राजकीय वर्तुळात देखील भिडे गुरुजींच्या या वक्तव्यामुळे दावे प्रतिदाव्यांचं सत्र सुरु आहे. त्यामुळे आता भिडे गुरुजींवर सरकार कोणती कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हेही वाचा : 


Sanjay Shirsat : असं चालणार नाही, भिडे गुरुजींवर कारवाई होईलच; संजय शिरसाट संतापले