32 Years of Mowad Flood : नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील मोवाड येथे 30 जुलै 1991 च्या पहाटे मोवाड परिसरात वर्धा नदीने (Wardha River) रौद्ररुप धारण केले होते. त्यापूर्वी ही या गावाने वर्धा नदीचे असंख्य पूर (Flood) पाहिले होते. परंतु 1991 चा महापूर भयावह होता. त्यामुळे तेव्हाच्या वेदना आजही कायम आहेत. मोवाडसह वर्धा नदीच्या काठावरील 12 गावांसाठी त्या दिवशी वर्धा नदी कोपली होती. नदीचा नेहमीचा पाट त्या दिवशी प्रचंड विस्तारला होता. पाण्याने अवतीभवतीच्या शेकडो हेक्टर शेतीला गिळंकृत करत गावांमध्ये प्रवेश केला होते. त्यामुळे पहाटेच्या सुमारास बेसावध असताना पाण्याचा प्रवाह 204 जणांना सोबत घेऊन गेला होता. पुढील अनेक दिवस मोवाड आणि जवळच्या गावापासून कित्येक किलोमीटर लांबपर्यंत लोकांचे मृतदेह चिखलात आढळले होते. आज त्याच दुर्दैवी घटनेला 32 वर्षे पूर्ण झाली असून मोवाडवासी आजही त्या घटनेच्या सावटातून बाहेर येऊ शकलेले नाहीत. 


काय घडले होते त्या दिवशी?


मोवाड हे अत्यंत जुने गाव सर्व अर्थाने समृद्ध होते. त्यामुळे "मोवाड हे सोन्याचे कवाड(दार)" ही म्हण संपूर्ण नागपूरात प्रसिद्ध होती. मोवाड हे गाव महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर वसलेले आहे. मोवाड हे नरखेड तालुक्यातील गाव असून वर्धा नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. 30 जुलै 199 रोजी रात्रभर सलग झालेल्या तुफान मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरुन वाहत होते. दिवस उजडण्याआधीच संपूर्ण मोवाड गाव जलमयग्न झाले होते. झोपेत असलेल्या मोवाडवासियांना सावरण्याची संधी सुद्धा मिळाली नव्हती आणि लोक पाण्याचा लोट व त्यासह आलेल्या चिखलात वाहून गेले होते. पुढील अनेक दिवस मोवाड आणि जवळच्या गावापासून कित्येक किलोमीटर लांबपर्यंत लोकांचे मृतदेह चिखलात आढळले होते.


मोवाड होते सोन्याचे कवाड


मोवाड नगरपालिकेची स्थापना 17 मे 1867 रोजी झाली होती. त्याला 154 वर्षे पूर्ण झाली आहेत. इंग्रजांच्या कालपासून इथली नगरपरिषद, स्वातंत्र्य संग्रामांचा इतिहास, चलेजाव आंदोलन खूप प्रसिद्ध होते. मोवाडमध्ये विणकरांची मोठी बाजारपेठ होती. सोबतच इथली बैलबाजार देखील संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध होती. त्याकाळी येथे संत्रा आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत असे. त्यामुळे मोवाड गावात समृद्धी होती आणि त्यामुळेच मोवाड सोन्याचे कवाड असे त्याकाळी म्हंटले जात होते. मात्र महापुराच्या त्रासदीनंतर आज मोवाडमध्ये सर्व काही बदलेले आहे. गावाची समृद्धी महापुराने वाहून नेली आणि नंतर राजकारण्यांनी पुनर्वसन आणि लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष केल्यामुळे गाव तीन दशकानंतर ही महापुराच्या धक्क्यातून सावरला नाही.




मोवाडवासी पाळणार काळा दिवस


महापूरामुळे जीवनाची घडी विस्कटल्याची खंत लोकांच्या चेहऱ्यावर दिसून येते. महापुराच्या विनाशाला 32 वर्षे पूर्ण होत झाली. निष्पाप 204 लोकांना जलसमाधी मिळाली. म्हणून दर वर्षी 30 जुलै काळा दिवस म्हणून पाळण्यात येतो. 30 जुलैला व्यापारी दुकाने बंद ठेवतात. प्रत्येक घरचा नागरिक श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी जातो. अनेक घरात आज ही आप्तस्वकीयांच्या आठवणीने चूल पेटवली जात नाही. 


जेवढं दुःख महापुराचा तेवढाच राग नंतर शासकीय यंत्रणेने केलेल्या दुर्लक्षाचा


महापूरानंतर मोवाड गाव हळूहळू कामाला लागले तरी शासकीय यंत्रणेच्या अपयश पावलो पावली जाणवते. गावाचे गावपण पुन्हा केव्हा परतेल, आणखी किती दिवस वाट बघावी लागेल, याचीच येथील प्रत्येक नागरिक वाट बघत आहे. विणकरांच्या व्यवसायाला पुन्हा भरभराटी आणण्यासाठी गेल्या 30 वर्षात शासनाकडून प्रयत्न झाले नाही. केवळ खोटी आश्वासने देऊन मतांचा जोगवा मागण्याचे काम करण्यात आले. पंचक्रोशीत असलेली मोवाड बाजारपेठेची ख्याती कायमची पुसली गेली. ती पुन्हा यावी यासाठी शासकीय प्रयत्न झाले नाहीत. बाजार कमकुवत झाल्याने रोजगारही नष्ट झाले. रोजगारासाठी मोवाडमधील शिक्षित तरुण शहराकडे भटकंती करत असल्याचे विदारक चित्र आहे.


परत येईल का मोवाडचे वैभव?


महापुराच्या आधी मोवाड येथील शेतकऱ्यांजवळ जवळपास 1 हजार 650 एकर जमीन होती. महापूरामध्ये जवळपास 650 एकर जमीन खरडल्या गेली. आता ती पडीक आहे. परंतु अद्याप सर्व शेतकऱ्यांना शेतीचा मोबदला मिळाला नसल्याची तक्रार आहे. 400 एकर जागेमध्ये गावाचे पुर्नवसन झाले. 350 एकर जमीन रेल्वेमार्गात गेली. परिणामी शेती विस्कळीत झाली. महापुराच्या वेळी 11 हजार 500 लोकसंख्या होती. मात्र, नंतर गावात रोजगार नसल्यामुळे लोकांनी स्थलांतरण केले आणि आज गावाची लोकसंख्या 8 हजाराच्या घरात आहे.


मोवाडमधील शहीद पोलिसांचे पुतळे जागवताहेत आठवणी 




30 जुलै 1991 च्या महापुरात गावकऱ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात कर्तव्यदक्ष पोलीस समाधन इंगळे, वामनराव मेंढे हे शहीद झाले होते. आता फक्त स्थानिक पोलीस ठाण्याच्या प्राणंगात त्यांचे पुतळे आठवणींना उजाळा देत आहे. त्यांच्या पुतळ्यावर गेल्या 30 वर्षात छत सुद्धा टाकण्यात आले नाही. तसेच त्या पुतळ्या सभोवताली कठडे बांधून साधी डागडुजी पोलीस प्रशासन व शासन करत नाही. दर वर्षी फक्त श्रद्धांजली वाहण्याचे काम केले जाते. 


मोवाड गावात अत्यावश्यक असलेली विकासकामे


शहरातील अनेक रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. त्या ठिकाणी नवीन रस्ते बांधणे अत्यंत गरजेचे आहे. गावातील नळ योजना जुनी झाली असून गावासाठी आवश्यक असलेला पाणीपुरवठा करण्यात अक्षम आहे. अशात गावात पुरेसा पाणीपुरवठा करणारी नळ योजना निर्माण करणे आवश्यक आहे. गावातील शाळा, नगरपालिकेची इमारत तसेच अनेक इतर शासकीय इमारतींना डागडूजीची आवश्यकता आहे. 


त्यामुळे 32 वर्षांपूर्वी दुःखाच्या प्रसंगी फक्त सहानुभूती व्यक्त करुन विसरलेल्या शासनाने मोवाड गावाकडे पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.