Nagpur News नागपूर : काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात असतानाच काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.


मला आणि प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात येत असल्याचा, दावा शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे सध्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष सोडून जाणाऱ्यांना काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्र काँग्रेसचे  (Maharashtra Congress) प्रभारी रमेश चेन्निथला यांनी महत्वपूर्ण विधान करत खोचक सल्ला दिला आहे.


ज्यांना सोडून जायचं त्यांनी लवकर जावं.. 


राजकीय पक्षामध्ये आम्ही पक्ष आणि सत्तेसाठी लढत नाही. एक आदर्श विचारासाठी आम्ही पक्षात काम करत असतो. मात्र काही लोकांना पद नसले की ते निघून जातात. या जाणाऱ्या लोकांमुळे काँग्रेस पक्षाचे फार काही नुकसान होणार नाही. महाराष्ट्र काँग्रेस सक्षम असून महाराष्ट्रातून कोणी जाणार नाही. पक्ष एका आदर्शावर काम करतो आणि जो कार्यकर्ता या आदर्शावर चालत असतो तो पक्ष सोडून कधीही जाणार नाही, असा माझा विश्वास आहे.


ज्यांना जायचंच असेल त्यांनी लवकर जावं, असा सल्ला रमेश चेन्निथला यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते आणि नेत्यांना दिला आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पीसीसी एक्झिक्यूटिव्ह महाराष्ट्रातील सहा विभागामध्ये काँग्रेसच्या बैठकींचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील पहिली बैठक गुरुवारी 18 जानेवारीला विदर्भातील अमरावती येथे होत आहे. या बैठकीसाठी रमेश चेन्निथला नागपूरला आले असता त्यांनी हे भाष्य केले आहे.  


जागावाटपाची अंतिम यादी लवकरच 


काँग्रेसचे संघटन मजबूत आणि शक्तिशाली बनवण्यासाठी तसेच लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी या बैठकांचे आयोजन केले आहे. त्याकरिता आम्ही पहिल्यांदा आदिवासी भागामध्ये जाऊन बैठक घेणार आहोत. शहरात नेहमीच बैठका होतात. म्हणून यावेळेस आम्ही ग्रामीण भागात जात आहोत. त्याची सुरुवात विदर्भातून होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.


महाराष्ट्रातील आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसोबत चर्चा झालेली आहे. येणाऱ्या दिवसात कोणाला किती जागा दिल्या जाईल यावर लवकरच अंतिम शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर आम्ही पूर्ण ताकदीने या निवडणुकांना पुढे जाऊ. याबाबत सर्व मित्र पक्षासोबत बऱ्यापैकी सहमती झालेली आहे. येणाऱ्या दिवसात अंतिम यादी लवकरच जाहीर करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.  


भाजप, आरएसएसकडून इव्हेंट मॅनेजमेंटचे काम


अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा येत्या 22 जानेवारीला होणार आहे. यावर रमेश चेन्निथला यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, हिंदू धर्माची प्रामाणिकता सांगणारे चार शंकराचार्य जर त्या राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापणेसाठी जाणार नसतील तर तुम्ही आम्हाला का हा प्रश्न विचारता? ते म्हणतात हा राजकीय कार्यक्रम झालेला आहे. पंतप्रधानांच्या हस्ते जर उद्घाटन होणार असेल तर हे काय राजकारण नाही का?  प्रभूश्रीरामाला आम्ही मानतो, तेव्हा आम्ही हजारोंच्या संख्येत जाऊ. मात्र हे सगळं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय फायदा घेण्यासाठी सुरू आहे. त्याला आम्ही सहमत देत नाही. भाजप आणि आरएसएसकडून लोकसभेच्या पार्श्वभूमीवर इव्हेंट मॅनेजमेंटचे काम सुरू असल्याची टीका देखील रमेश चेन्निथला यांनी केली.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Congress : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय? थोरात-पटोले वादावर एक सदस्यीय समिती