Nagpur News : कोणतीही मोठी शस्त्रक्रिया करायची म्हणले की डाॅक्टर सुरूवातीला रुग्णांना बेशुद्ध करतात. मात्र तुम्ही कधी हे ऐकले आहे का की एखाद्या रूग्णाची शस्त्रक्रिया ही त्याला बेशुद्ध न करता करण्यात आली आहे. ऐकून आश्चर्य वाटेल पण नागपूरात दोन रूग्णांवर त्यांना बेशुद्ध न करता शस्त्रक्रिया (Surgery) करण्यात आली आहे. मेंदूत असणारी  गाठ काढण्याकरता असणारी अतिशय किचकट शस्त्रक्रिया नागपूरातील सुपर स्पेशलिटी रूग्णालयात यशस्वीरित्या पार पडली आहे. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया "Awake Craniotomy" या तंत्राच्या मदतीने करण्यात आली आहे.


रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एक पुरुष आणि एक महिला रुग्णाला तीव्र डोकेदुखीचा त्रास होता. अनेक रुग्णालयात उपचार घेतल्यानंतरही दोघांनाही काही फायदा झाला नाही. तीव्र डोकेदुखीमुळे दोन्ही रुग्णांना नीट बोलताही येत नव्हते. डॉक्टरांनी चाचणी केल्यावर दोघांना ब्रेन ट्यूमर म्हणजेच मेंदूत गाठ असल्याचे निदान झाले. दोघांच्या मेंदूमध्ये असलेली गाठ मेंदूच्या डाव्या बाजूला अशा ठिकाणी होती, जिथून मेंदूद्वारे व्यक्तीच्या बोलण्याची क्रिया नियंत्रित केली जाते. त्यामुळे त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करताना थोडीही दुखापत झाली असती, तर दोन्ही रुग्णांची बोलण्याची क्षमता कायमसाठी गेली असती. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर्सनी अवेक क्रेनिओटॉमी" तंत्रानुसार शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. या तंत्रात रुग्णाला पूर्णपणे बेशुद्ध न करता जागृत अवस्थेमध्येच त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाते.


या शस्त्रक्रियेसाठी फक्त आवश्यक अवयव बधीर केले जातात. दोन्ही रुग्णांचे आवश्यक समुपदेशन केल्यानंतर मेंदूमध्ये गाठ असलेल्या ठिकाणी शस्त्रक्रिया करून गाठ पूर्णपणे बाहेर काढण्यात आली. या शस्त्रक्रिये दरम्यान डॉक्टर्स सातत्याने रुग्णांशी बोलत होते. ज्यामुळे शस्त्रक्रिये दरम्यान रूग्ण प्रतिक्रिया देत आहे हे त्यांच्या लक्षात येत होते. शस्त्रक्रियेच्या वेळेला रुग्णांना वेदना होऊ नये म्हणून सलाईनद्वारे वेदनाशामक औषधही दिली जात होती. शस्त्रक्रियेनंतर दोन्ही रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून रुग्णालयातून त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे.


संबंधित शस्त्रक्रिया ही डॉ. प्रमोद गिरी आणि डाॅ. संजोग गजभिये यांनी केल्या असून यांनी झालेल्या सर्जरीविषयी समाधान व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, "योग्य नियोजन आणि केलेल्या समुपदेशनाामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. या संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान आम्हाला एकमेव चिंता होती ती म्हणजे रुग्णांची बोलण्याची क्रिया नियंत्रित ठेवण्याची. सुदैवाने शस्त्रक्रिया यशस्वी होऊन दोन्ही रूग्ण सुखरूप आहेत."


इतर महत्वाच्या बातम्या


Nagpur News : नागपुरात डोळ्यांची साथ, 25 टक्के लहान मुलांमध्ये लक्षणं; विशेष लक्ष देण्याच्या शाळांना सूचना