Nitin Gadkari on Sharad Pawar : 'शरद पवार (Sharad Pawar) हे म्हणजे जपानी गुडिया प्रत्येकाला वाटतं की, ती आपल्याकडे बघूनच डोळा मारत आहे', असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे नागपूरमध्ये (Nagpur) भाजपच्या (BJP) नागपूर ग्रामीण युनिटमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमामध्ये त्यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. या कार्यक्रमावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) देखील उपस्थित होते.
नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?
'जपानी गुडिया जशी प्रत्येकाकडे बघून डोळा मारते तसचं काहीसं शरद पवारांचं आहे. कार्यकर्त्याला असचं वाटतं साहेब आपल्याकडे बघून बोलत आहेत, कामाला लागा. पण त्यानंतर तिकीट मात्र भलत्यालाच मिळते', असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. या कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सल्ला देखील दिला आहे. यावेळी बोलतांना गडकरी म्हणाले की, 'थिंक फॉर द बेस्ट अॅन्ड प्रीपेअर फॉर द वर्स्ट.' वर्स्ट'पुढे बोलतांना गडकरी म्हणाले की, 'आपण नेहमी आपलं काम व्यवस्थित करावं. मिळालं तर बोनस नाही मिळालं तर दु:ख नाही.' पण नेत्यांना चॉकलेट वाटण्याशिवाय पर्याय नसतो अशी मिश्लिक टीप्पणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
अरविंद गजबिये यांना दिला सल्ला
या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अरविंद गजबिये यांना देखील सल्ला दिला आहे. अरविंद गजबिये तुमचं काम बावनकुळे नक्की करतील असा आशावाद गडकरी यांनी व्यक्त केला आहे. तर पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं आहे की, 'बावनकुळे यांनी तुमचं काम केलं तरी भलं नाही केलं तरी भलं.' पण तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करत राहा, त्याचा आनंद घेत राहा. असा सल्ला नितीन गडकरी यांनी अरविंद गजबिये यांना दिला आहे.
नितीन गडकरींना शरद पवारांच्या बाबत केलेल्या या वक्तव्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून गडकरींच्या या टीकेला काही उत्तर मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच यावर शरद पवार काही भाष्य करणार का हे पाहणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा दावे - प्रतिदाव्यांच सत्र सुरु होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.