Maharashtra Politics: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि पंतप्रधान मोदी (PM Modi) लवकरच एका मंचावर दिसणार आहेत. शरद पवार आणि पंतप्रधान मोदी 1 ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या टिळक पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीतील (NCP) बंडखोरी आणि अजित पवार (Ajit Pawar) एनडीएमध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच मोदी आणि थोरले पवार एकत्र एकाच मंचावर दिसणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेच विरोधी महाआघाडी 'इंडिया'चे शिल्पकार मानले जातात. दरम्यान, मणिपूरच्या मुद्द्यावरून संसदेतही सरकार आणि विरोधकांमध्ये वाद-विवाद सुरू आहेत. याशिवाय केंद्र सरकार दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या पदस्थापना आणि बदल्यांशी संबंधित अध्यादेशावर संसदेत विधेयक मांडणार आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात होणाऱ्या मोदींच्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाबाबत राजकीय वर्तुळात चर्चांनी जोर धरला आहे. 


पवारांच्या मोदींसोबतच्या उपस्थितीनं I.N.D.I.A आघाडीत नाराजी?


1 तारखेला पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं मोदींना सन्मानित केलं जाणार आहे. मोदींनी हा पुरस्कार स्वीकारावा यासाठी स्वतः शरद पवारांनीच मध्यस्थी केली होती. राज्यसभेत दिल्ली पोस्टिंगबाबतचं वादग्रस्त विधेयक नेमकं कधी येणार याची तारीख अद्याप तरी निश्चित नाही. पण सोमवारी किंवा मंगळवारी ते राज्यसभेत चर्चेला येऊ शकतं अशी शक्यता आहे. 


दोन्ही कार्यक्रमाची वेळ एकच झाल्यास पवार नेमके कुठे असणार याची चर्चा आहे. मोदींविरोधात एकजुटीची हालचाल विरोधकांमध्ये असताना त्यांच्यासोबत व्यासपीठ शेअर करण्यावरुन काही पक्षांनी विरोधकांच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली आहे. 'द हिंदू'च्या बातमीनुसार, तर एका नेत्यानं झोपलेल्यांना जागं करता येतं, पण ज्यांनी झोपेचं सोंग घेतलंय, त्यांना कसं जागं करणार, अशी टिपण्णी केली आहे. 


शरद पवार कशाला प्राधान्य देणार? 


लोकसभेतल्या अविश्वास प्रस्तावाआधी विरोधकांच्या एकजुटीची मोठी परीक्षा या विधेयकाच्या निमित्तानं होणार आहे. राज्यसभेत भाजपला बहुमतासाठी काही जागा कमी आहेत, पण जगनमोहन रेड्डी यांचा पक्ष मदतीला आल्यानं भाजपची ती चिंता दूर होणार आहे. शिवाय बीजेडी सारखे पक्ष अगदी तटस्थ राहिले तरी भाजपचं काम होतं. या विधेयकाला राज्यसभेत हाणून पाडण्याइतपत संख्या विरोधकांकडे नसली तरी सरकारला घाम फोडण्याची, यानिमित्तानं एकजुट दाखवण्याची संधी विरोधकांना आहे. 


दरम्यान, एकीकडे महाराष्ट्रात राष्ट्रवादीतल्या दोन गटांमध्ये नेमकं काय चालू आहे याचा संभ्रम आहे. कायदेशीर लढाई काहीशा संथपणे सुरु आहे. दोन्ही गटाचे प्रदेशाध्यक्ष एकमेकांच्या जाहीर गळाभेटी घेत आहेत. त्यात आता जर विधेयकावर मतदानाची वेळ अगदी मोदींच्या कार्यक्रमाच्याच दिवसाची आली तर पवार कशाला प्राधान्य देतात यातून मोठे अर्थ निघणार यात शंका नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Monsoon Session: संसदेत आज सादर होऊ शकतं दिल्ली सेवा विधेयक; 'INDIA' च्या खासदारांची रणनिती काय? सभागृहात पुन्हा गदारोळाची शक्यता