Nagpur Crime News : गेल्या अकरा महिन्यात घरफोडीचा (burglaries) आलेख सातत्याने वाढत असल्याचे चित्र शहरात आहे. त्यातून दररोज घरफोडींची प्रकरणे समोर येत असून त्यातून चोरट्यांनी नागरिकांचे दिवाळे काढले आहेत. गेल्या 43 दिवसात जवळपास 150 घरफोडीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. गेल्या आठ महिन्यात 651 घरफोडीची प्रकरणे समोर आली. सप्टेंबर महिन्यात 56 तर ऑक्टोबर महिन्यात 67 घरफोडींच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे.


त्यात परिमंडळ 4 मधील हुडकेश्‍वर, बेलतरोडी, जरिपटका, वाठोडा ठाण्यात सर्वाधिक घरफोडी झालेल्या आहेत. यानुसार उपराजधानीत दररोज चार घरफोड्या होत असून 12 महिन्यात 700 हून अधिक गुन्‍ह्यांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती आहे. 


घरफोडीच्या घटनांनी नागपूरकरांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे. लग्नासाठी बाहेरगावी असो वा घराला कुलूप लावून जरा बाहेर गेले, तर घरात चोरटे शिरुन संपूर्ण मुद्देमाल चोरत असल्याच्या घटना घडत आहेत. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी ठेवलेले दागिने सुरक्षित नसल्याने नागरिकांमध्ये रोषही दिसून येत आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत झालेल्या चोरीच्या प्रकरणात कोट्यवधींचा माल चोरुन नेल्याचेही आढळले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


पोलीसही अपयशी..


घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसवण्यात पोलिसांना अपयश येत आहे. 22 ऑक्टोबरला सुरु झालेल्या दिवाळीच्या पहिल्या दिवसांपासून तर 6 नोव्हेंबरदरम्यान 35 घरफोडींच्या घटना घडल्याचे दिसून आले. हा आकडा महिन्याभरात पन्नासवर होता. डिसेंबरमध्येही दररोज पोलीस वार्तांमध्ये किमान एका घटनेची नोंद करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात दररोज किमान चार घरफोडीच्या घटना घडल्याचे दिसून आले. त्यानुसार या महिन्यात 40 घरफोड्यांची नोंद करण्यात आली आहे. दुसरीकडे जबरी चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. तब्बल 161 जबरी चोरीचे प्रकरण उघडकीस आले असून त्यापैकी 116 प्रकरणे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.


दिवाळीत काढले नागपूरकरांचे दिवाळे


घरफोडी चोरट्यांवर आळा घालण्यात पोलिसांना सपेशल अपयश येत असल्याने दिवाळीच्या 14 दिवसांच्या कालावधीत तब्बल 35 घरफोडींचे गुन्हे उघडकीस आले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक घरफोड्या हुडकेश्‍वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे दिसून येत आहे.


गाजलेले प्रकरण...


शहरातील भाजपाचे माजी नगरसेवक संदीप गवई यांच्या घरी चोरट्याने शिरुन लाखोंचे दागिने आणि रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना दीड वर्षांपूर्वी घडली होती. मात्र, त्या घटनेनंतर अद्याप चोराचा सुगावा लागला नाही. याशिवाय बजाजनगरातील बंदुकीच्या साहाय्याने टाकलेल्या दरोड्याचाही सुगावा लागलेला नाही हे विशेष.


अशी आहे आकडेवारी (नोव्हेंबरपर्यंत)


         गुन्हे            नोंदणी     तपास



  • घरफोडी      654        240 उघडकीस

  • जबरी चोरी   161        116

  • दरोडा             8            8

  • खून               61


ही बातमी देखील वाचा...


त्या कटआऊटचा फोटो व्हायरल झाला अन् मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची 'उंची' समान झाली!