Sanjay Raut : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) हे घटनात्मक पदावर बसले आहेत. मात्र, ते एकपक्षीय काम करत असल्याचा आरोप शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. राहुल नार्वेकर हे पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे बोलत आहेत. विरोधी पक्षांना विशेषत: शिवसेनेच्या सदस्यांना सभागृहात बोलू दिलं जात नाही. ते पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप राऊतांनी केला. राहुल नार्वेकर लोकशाहीचा गळा घोटत असल्याचेही राऊत म्हणाले.
विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचे काम सुरु
घटनात्मक पदावर बसेलेली व्यक्तींनी पक्षपाती वागू नये. त्यांनी नियम, कायदा आणि घटनेचे पालन करावं असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. त्या खुर्चीवर बसल्यावर तुम्ही पक्षाची वस्त्र आणि चपला बाहेर काढून ठेवल्या पाहिजेत. पण दुर्दैवाने राहुल नार्वेकर अध्यक्ष झाल्यापासून हे होत नसल्याचे राऊत म्हणाले. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचे काम सुरु आहे. शिवसेनेच्या लोकांना बोलू दिलं जात नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर राहुल नार्वेकर काम करत असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.
मुंबई केद्रशासीत प्रदेश करण्याची मागणी करणारे मूर्ख
सीमाभागात जे मराठी बांधव राहत आहेत त्यांच्यावर कर्नाटक सरकार अन्याय करत आहे. त्यांच्याकडून सुप्रीम कोर्टानं दिलेले आदेश पाळले जात नाहीत म्हणून हा भाग केंद्रशासीत प्रदेश करावा अशी आमची मागणी असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. मुंबई केद्रशासीत प्रदेश करण्याची मागणी करणारे मूर्ख असल्याचे राऊत म्हणाले.
काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी प्रस्तावावर सह्या केल्या
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यासंदर्भात मविआकडून विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना पत्र सोपवलं आहे. याबाबत देखील संजय राऊत यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला. उद्धव ठाकरे यांच्यासमोर काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी प्रस्तावावर सह्या केल्या आहेत. राष्ट्रावदीलाही याबरोबर यायचे आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या प्रस्तावावर सही केली की नाही याबाबत मला माहित नसल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले. विधानसभा अध्यक्ष पक्षपाती वागत आहेत. याआधी कधीही विधानसभा अध्यक्षांवर अविश्वासाचा प्रस्ताव आला नव्हता असेही संजय राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: