नागपूर: सलग एक दशक वसंतराव नाईक झोपडपट्टीत (Naik Slum) दहशत पसरवणाऱ्या भुरू उर्फ शेख अकरम शेख रहमान आणि पप्पू उर्फ कमलेश द्वारकाप्रसाद गुप्ताला मोक्काच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश (Special Court) एम. एस. आझमी यांनी रोहित जैन हत्याकांडात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात इतर चार आरोपींवर आरोप सिद्ध न झाल्याने त्यांची सुटका करण्यात आली. सुटलेल्या आरोपींची नावे अनूप अण्णा भोसले, भास्कर ऑस्टिन जोसेफ, सचिन केसरसिंग ठाकुर आणि विशाल नारायणस्वामी रेड्डी आहेत. सर्वांवर लखनादौन, सिवनी येथील रोहित उर्फ श्रीपाल जिनेंद्रकुमार जैन (35) च्या खुनाचा आरोप होता. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता पोलिसांनी त्यांच्यावर मोक्काही लावला होता, मात्र मोक्कातून सर्वांची सुटका करण्यात आली.


खून करून खड्ड्यात पुरला होता मृतदेह


24 सप्टेंबर 2012 ला रात्री भुरू आणि त्याच्या साथीदारांनी रोहितचा खून केला होता. त्यावेळी वसंतराव नाईक झोपडपट्टीत भुरूची दहशत होती. जुगार, सट्टा, दारू आणि गांजा असे सर्व अवैध धंदे त्याची टोळी करीत होती. वस्तीत राहणाऱ्या मजूर वर्गातील लोकांमध्ये भुरूची असी दहशत होती की, कोणीही त्याच्या विरुद्ध तोंड उघडत नव्हता. रोहितला जुगार खेळण्याचे व्यसन होते. त्यासाठी तो नेहमी नागपूरला (Nagpur) येत होता आणि भुरूच्या अड्ड्यावर जुगार खेळून परत जात होता. एकदा तो जुगारात मोठी रक्कम हरला. त्याने भुरूकडून पैसे उसणे घेतले. मात्र ते पैसे तो परत करू शकला नाही. त्यामुळे घटनेच्या दिवशी भुरू आणि त्याच्या टोळीने रोहितवर शस्त्रांनी हल्ला करून खून केला. हॉकी मैदानालगतच्या एका झोपड्यात परिसरातील तरुणांकडून खड्डा खंदून घेत रोहितचा मृतदेह त्यात पुरला.


त्या हल्ल्यात भुरू वाचला, मात्र भावाचे गेले प्राण


भुरू, त्याचा भाऊ इकबाल शेख आणि इतरांनी परिसरात चांगलीच दहशत पसरवून ठेवली होती. ते मनात येईल त्याला मारहाण करीत होते. अशात झोपडपट्टीवासीयांचा संताप उडाला. 9 ऑक्टोबरला रात्री भुरू आणि त्याच्या साथीदारांनी परिसरात राहणाऱ्या ईश्वरी शाहूला खड्ड्यातून रोहितचा मृतदेह काढण्यासाठी बोलावले. त्याने नकार दिला असता जबर मारहाण केली. वस्तीतील लोकांनाही धमकावले. त्याच्यामुळे त्रस्त लोकांचा धीर सुटला. त्यांनी भुरू टोळीवर (Bhuru Gang) हल्ला केला. जबर मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात भुरूचा भाऊ इकबाल याचा मृत्यू झाला. मात्र भुरू आणि इतर आपला जीव वाचवून पसार होण्यात यशस्वी झाले. या घटनेनंतर रोहित हत्याकांडाचा खुलासा झाला होता.


34 साक्षीदारांची साक्ष नोंदविली


इकबालच्या खुनानंतर परिसरात भुरूचे साम्राज्य उद्धवस्त झाले. पोलिसांनी 6 आरोपींना अटक करून खून, दंगा आणि मोक्का अन्वये गुन्हा नोंदविला होता. तत्कालीन एसीपी धर्मशी यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) म्हणून विजय कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली. कोल्हे यांनी न्यायालयासमोर 34 साक्षीदारांची (witnesses) साक्ष नोंदविली. दोन साक्षीदार फितूर झाले. याचा लाभ इतर आरोपींना मिळाला, मात्र भुरू आणि पप्पू गुप्तावर आरोप सिद्ध झाले. न्यायालयाने पुरावा नष्ट केल्या प्रकरणीही आरोपींना दोषी ठरविले आहे.


संपूर्ण शहरात उडाली होती खळबळ


वसंतराव नाईक झोपडपट्टीतील या प्रकरणाने संपूर्ण शहरात खळबळ उडविली होती. शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लागले होते. प्रकरणात पोलिसांचा निष्काळजीपणाही समोर आला होता. परिसरातील नागरिक पोलिसात तक्रार करीत होते, मात्र कारवाई होत नव्हती. त्यामुळे तत्कालीन ठाणेदार प्रकाश जाधवसह 7 कर्मचाऱ्यांना निलंबितही करण्यात आले होते.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Abhijit Wanjari : आमदार प्रशांत बंब यांचा बंब लीक झालाय, त्याला गळती लागलीये, शिक्षक आमदार अभिजीत वंजारी यांची टीका


Inter Caste Marriage Scheme : आंतरजातीय विवाह अनुदान योजनेचा बोजवारा, 2.33 कोटींचा प्रस्ताव प्रलंबित