नागपूर : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीच्या निमित्ताने नागपुरात दीक्षाभूमीवर वेगळाच उत्साह दिसून येत आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्ष बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमीवर प्रवेश बंद होता. मात्र यंदा निर्बंध मुक्त वातावरणात बाबासाहेबांची जयंती साजरी केली जात असून मोठ्या संख्येने बाबासाहेबांच्या विचारांना मानणारे अनुयायी दीक्षाभूमीवर येत आहेत. 


दीक्षाभूमी परिसर पंचशील ध्वजानी फुलून गेला असून उन्हाची तीव्रता पाहता दीक्षाभूमीच्या मुख्य स्तूप समोर पेंडोल लावण्यात आला आहे. सकाळीच समता सैनिक दलाच्या वतीने दीक्षाभूमी परिसरात परेड करत बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर सलामी देण्यात आली. नऊ वाजता भंते सुरई ससई यांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना करण्यात आली. 


अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधी सुद्धा आज दीक्षाभूमीवर हजेरी लावत असून सकाळीच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे दीक्षाभूमीवर दाखल झाले होते तर राज्याचे राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार आणि नागपूरचे पालकमंत्री व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही दीक्षाभूमीवर येऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.


डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर आज दिवसभर अनेक कार्यक्रम ठेवण्यात आले असून अनुयायांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधेसाठी अनेक उपाय केल्याची माहिती डॉ बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांनी दिली आहे.


दरम्यान कोरोना आणि लॉकडाऊमुळे दोन वर्ष आंबेडकर जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली नव्हती. परंतु यंदा निर्बंध हटल्याने मोठ्या उत्साहात आंबेडकर जयंती साजरी केली जात आहे. या निमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रम तसंच उपक्रम राबवले जात आहेत. 


संबंधित बातम्या