नागपूर : नागपूरचं पोलीस दल कायमच चर्चेत असतं. कधी तिथल्या कायदा सुवस्थेचे तीनतेरा उडाल्याच्या नकारात्मक बातमीमुळे तर कधी पोलिसांच्या बदलीबाबत उचललेल्या सकारात्मक पावलांमुळे. परंतु सध्या नागपूरच्या पोलीस दलाची चर्चा आहे ती एकाच वेळी 17 कर्मचाऱ्यांच्या निलंबनामुळे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 17 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. आजारी असल्याच्या कारणाने किंवा इतर कुठल्याही कारणाने गेल्या सहा महिन्यापेक्षा जास्त काळ सुट्टीवर असलेल्या आणि वारंवार सूचना देऊनही कर्तव्यावर रुजू न झाल्याने त्यांनी ही कारवाई केली आहे. एकाच वेळी 17 पोलीस कर्मचारी निलंबित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.


ठोस कारण न देता वारंवार कामावर गैरहजर राहणाऱ्या तब्बल 17 पोलिसांना नागपूर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित केले आहे. आरोग्य आणि अन्य रजा घेऊन सतत कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या पोलिसांची यादी तयार करण्यात आली होती. यामध्ये अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. वारंवार गैरहजर राहणाऱ्या या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना दोन दिवसांपूर्वी कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर काही कर्मचारी हजर झाले तर काही कर्मचारी त्यानंतरही हजर झाले नाहीच आणि यासाठी ठोस कारण देऊ शकले नाहीत. अशा वारंवार गैरहजर राहणाऱ्या सतरा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे आणि काही कर्मचारी निलंबनाच्या मार्गावर असल्याची माहिती आहे.


पोलीस दलातील बदल्यांचा 'नागपुरी पॅटर्न'
पोलीस दलातील बदल्यांच्या विषयावरुन राज्याच्या राजकारणात मोठे वादंग निर्माण झालं. सुमारे दोन वर्षांपूर्वी पोलिसांच्या बदल्यांवरुन सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप, चौकशा आणि न्यायालयीन खटले अद्याप थांबलेले नाहीत. मात्र, त्याच पोलीस दलातील बदल्यांमध्ये एक छोटा मात्र अत्यंत सकारात्मक बदल नागपुरात पाहायला मिळत आहे. नागपुरात पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये कमालीची पारदर्शकता आणण्यात आली आहे. कोणत्याही शिफारशी शिवाय, छुपे अर्थपूर्ण व्यवहार न होता, पारदर्शक पद्धतीने सर्वांच्या समोर इच्छा आणि उपलब्ध जागेप्रमाणे एकाच दिवशी तीन तासात साडेसहाशे पोलीस कर्मचाऱ्यांना समाधानकारक बदल्या मिळाल्या. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात अभिनव योजना अमलात आणली. या अंतर्गत एकाच जागेवर (पदावर) पाच वर्षे पूर्ण झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या 3 जागा विचारण्यात आल्या. सर्व पात्र कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पसंतीच्या तीन जागा सुचवल्यानंतर सर्वांना एकाच वेळी पोलीस जिमखान्याच्या हॉलमध्ये बोलावण्यात आलं. त्या ठिकाणी दर्शनी भागात लावलेल्या बोर्डावर नागपुरातील सर्व पोलीस स्टेशन्स आणि पोलिसांच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध असलेल्या जागांची माहिती देत, त्यापैकी रिक्त असलेल्या जागा ही बोर्डावर सर्वांना दिसेल अशा पद्धतीने दर्शवल्या गेल्या. त्यानंतर प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला समोर बोलावत त्याच्या पसंतीच्या जागा विचारत उपलब्ध जागेप्रमाणे बदल्या देण्यात आल्या.