Dr.Babasaheb Ambedkar jayanti 2022: डॉ. भीमराव आंबेडकर यांचे जीवन खूप संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते केवळ मागासवर्गीयांच्या हक्कांसाठीच लढले नाहीत तर पक्षपात आणि जातिव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारे समाजसुधारकही होते. आंबेडकर जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी साजरी केली जाते. आंबेडकर जयंतीचा इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे.
आंबेडकर जयंतीचा इतिहास
14 एप्रिल 1928 रोजी जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी पुण्यात प्रथमच डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी केली. जनार्दन सदाशिव रणपिसे हे आंबेडकरांच्या अत्यंत निष्ठावान अनुयायांपैकी एक होते. तेव्हापासून दरवर्षी 14 एप्रिलला आंबेडकर जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. भारतात, 14 एप्रिल ही दरवर्षी अधिकृत सार्वजनिक सुट्टी असते.
डॉ. बाबासाहेब दलित समाजाच्या समान हक्कासाठी लढायचे. याशिवाय भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करून जात, धर्म, संस्कृती, पंथ इत्यादी बाजूला सारत सर्व नागरिकांना समान अधिकार दिले. आंबेडकर राज्यसभेतून दोनदा खासदार म्हणून निवडून आले. डॉ भीमराव आंबेडकर यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. 1990 मध्ये बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चैत्यभूमीवर लगबग, महामानवाची जयंती उत्साहात होणार साजरी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यंदा राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे जयंती साधेपणाने साजरी करण्यात येत होती. मात्र यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने पण आरोग्याची काळजी घेऊन साजरी करू असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. कोरोनाचे सावट कमी झाले आहे, मात्र आरोग्याच्या नियमांचे पालन करून हा जयंती उत्सव आपण उत्साहाने साजरा करूयात, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहयाद्री अतिथीगृह येथे मंगळवारी आयोजित बैठकीत सांगितले होते.
चैत्यभूमी येथे हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी
मुंबई महापालिका आणि राज्य शासनाच्या वतीने सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे जयंती दिनी राज्य शासनाच्या वतीने चैत्याभूमी येथे हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीच्या मागणी यावेळी मान्य करण्यात आली आहे.