सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात अनोखा उपक्रम राबवण्यात आला. पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले असताना केवळ एक रुपया प्रति लिटर प्रमाणे पेट्रोलचं वाटप करण्यात आले. सोलापुरातल्या डॉ. आंबेडकर स्टुडन्टस आणि युथ पँथर्स या संघटनेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. सोलापुरात आज पेट्रोलचा दर 120.18 रुपये आहे.


सध्या महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. पेट्रोलचे दर हे 120 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाचशे नागरिकांना एक रुपयाप्रमाणे पेट्रोल देत बाबासाहेबांना अभिवादन करत असल्याची भूमिका संघटनेच्या वतीने मांडण्यात आली. अवघ्या एक रुपयात पेट्रोल मिळत असल्याने नागरिकांची तुंबड गर्दी पेट्रोल पंपावर झाली होती. भली मोठी रांग यावेळी पेट्रोल पंपाच्या समोर दिसून आली. मात्र यातील पाचशे नागरिकांना प्रति एक लिटर प्रमाणे पेट्रोल वाटप संघटनेच्यावतीने करण्यात आले. 




दरम्यान महागाई वाढलेली असताना आमच्यासारखी छोटी संघटना पाचशे लोकांना पेट्रोल वाटप करुन दिलासा देऊ शकते तर सरकारने देखील नागरिकांना दिलासा द्यावा, असा देण्याचा उद्देश या उपक्रमामागचा असल्याची भावना डॉ. आंबेडकर स्टुडन्टस आणि युथ पँथर्स संघटनेचे अध्यक्ष महेश सर्वगोड यांनी व्यक्त केली.


अनेक शहरात पेट्रोल 120 रुपये प्रति लिटर
एप्रिल महिन्यात सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी 6 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणतीही दरवाढ केलेली नाही. यापूर्वी गेल्या बुधवारी (6 एप्रिल) रोजी पेट्रोल-डिझेल दोन्ही इंधनाच्या दरांमध्ये 80 पैसे प्रति लिटरची वाढ करण्यात आली होती. 22 मार्चपासून आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये 10 रुपये प्रति लिटरची वाढ झाली आहे. तरीही देशातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती 120 रुपये प्रति लिटर पार पोहोचल्या आहेत. तर डिझेलनेही शंभरी ओलांडली आहे. देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचे दर सध्या 120.51 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर डिझेल 104.77 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत.


बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 131 वी जयंती आहे. कोरोना आणि लॉकडाऊमुळे दोन वर्ष आंबेडकर जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली नव्हती. परंतु यंदा निर्बंध हटल्याने मोठ्या उत्साहात आंबेडकर जयंती साजरी केली जात आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रम तसंच उपक्रम राबवले जात आहेत. असाच उपक्रम आज सोलापुरात राबवण्यात आला.