Nagpur Spices Price Hike : आधीच भाज्यांचे दर गगनाला भिडले असताना नागपुरात (Nagpur) मसाल्यांच्या दरवाढीने (Spices Price) सर्वसामान्यांच्या किचनचं बजेट कोलमडलं आहे. बहुतांश मसाल्यांचे दर 50 ते 80 टक्क्यापर्यंत वाढले आहेत. मागणी आणि पुरवठा सुरळीत असताना अचानक झालेली ही वाढ काही मोठ्या होलसेलर व्यापाऱ्यांनी ठरवून केलेली कृत्रिम दरवाढ असल्याची शंका स्थानिक व्यापारी व्यक्त करत आहेत.
मोठ्या व्यापाऱ्यांचं नुकसान भरुन काढण्यासाठी कृत्रिम दरवाढ?
आधी मोठी वेलची ही 550 रुपये किलो होती ती आता 1150 रुपये झाली, मगज बी जे 300 रुपये किलो होतं ते आता 800 रुपये झाले आहे. खसखस जी 1000 किलो होती ती आता 1600 रुपये किलो झाली आहे. जिरे जे दोन महिन्यांआधी 250 रुपये होते ते आता 700 रुपये किलो झाले आहे. छोटी वेलची 1500 रुपये किलो होती आता 2400 रुपये किलो झाली आहे. लवंग आधी 750 रुपये किलो होती आता 1000 रुपये किलो झाली आहे. दोन हजारच्या नोटबंदीनंतर काही मोठ्या व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी ही कृत्रिम दरवाढ केल्याचा सूर छोट्या व्यापाऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे.
जाणून घेऊया दोन महिन्यांपूर्वीचे आणि आताचे दर
मसाले | दोन महिन्यांपूर्वीचे दर | आताचे दर |
मोठी वेलची | 550 रुपये किलो | 1150 रुपये किलो |
मगज बी | 300 रुपये किलो | 800 रुपये किलो |
खसखस | 1000 रुपये किलो | 1600 रुपये किलो |
जिरे | 250 रुपये किलो | 700 रुपये किलो |
छोटी वेलची | 1500 रुपये किलो | 2400 रुपये किलो |
लवंग | 750 रुपये किलो | 1000 रुपये किलो |
काळे मिरी | 500 रुपये किलो | 850 रुपये किलो |
लातूरमध्ये नाष्टा, भोजन आणि मुखशुद्धीच्या जिन्नसात भाववाढ
जसा अधिक महिना सुरु झाला त्यावेळेस पासून किराणा मालाचे दर हे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. लातूरमध्ये मागील पंधरा ते वीस दिवसांमध्ये किराणा मालाच्या जिन्नसात मोठी भाव वाढ पाहायला मिळत आहे. डाळीमध्ये पाच ते दहा रुपयांची वाढ होताना दिसते आहे. तांदूळ, पोहे, शेंगदाणे, गहू या जिन्नसामधील भाव वाढ तर दहा ते पंचवीस रुपयांपर्यंत दिसून येत आहे. पोहे, गहू, ज्वारी, तांदूळ, साखर, तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, चना डाळ, या किराणा मालात मागील एक महिन्यात लक्षणीय भाव वाढ होत आहे. ज्वारी आणि पोह्याच्या दरामध्ये मोठी वाढ तर बडीशेपचे गगनाला भिडले आहेत. अचानकपणे किराणा मालाचे भाव किलोमागे दहा ते पंधरा रुपये वाढल्यामुळे प्रत्येक ग्राहकाच्या खिशाला जास्तीचा ताण पडणार आहे.
हेही वाचा