E Panchnama : नागपूर (Nagpur) विभागात प्रायोगिक तत्त्वावर ई-पंचनामा (E Panchnama) मोहीम सुरू झाली आहे. शेतकऱ्यांचे (Farmers) नुकसान मोजण्यासाठी आजवर केल्या जाणाऱ्या पारंपरिक पंचनामा प्रक्रियेपेक्षा जास्त अचूक आणि तीव्रतेने होणारी ही प्रक्रिया आहे. राजकीय हस्तक्षेप आणि कामचुकार कर्मचाऱ्यांच्यामुळं शेतकऱ्यांचं होणारं नुकसान नव्या प्रक्रियेत टाळता येणार आहे. नुकसान भरपाई दहा ते पंधरा दिवसात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळं होणारं शेतीचं नुकसान आणि त्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी केले जाणारे पंचनामे नेहमीच राजकीय हेवेदावे आणि आरोप प्रत्यारोपांचे केंद्रबिंदू ठरतात. मात्र, आता पंचनामे अचूक व्हावे, त्याला तंत्रज्ञानाची जोड मिळावी या उद्दिष्टाने नागपूर विभागात (पूर्व विदर्भात) प्रायोगिक तत्त्वावर 'ई पंचनामा' या उपक्रमाची तयारी सुरू आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रशासनाने 'ई पंचनामा' करणं सुरु केलं आहे. दरम्यान, प्रशासनाकडून सध्या नागपूर विभागात प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणारी ई पंचनाम्याची प्रक्रिया लवकरच संपूर्ण राज्यामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राबवली जाणार आहे.
काय आहेत ई पंचनाम्याची वैशिष्ट्य
पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या पंचनाम्यापेक्षा ई-पंचनामा जास्त अचूक
ई पंचनामा GIS प्रणालीवर आधारित आहे
ई पंचनामा करणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रत्यक्ष ठिकाणावर जावे लागणार
कार्यालयात बसून पंचनामे करता येणार नाहीत
जेवढं नुकसान तेवढंच सर्वेक्षण या तंत्रावर ई पंचनामा आधारलेला असल्याने त्यात गाव पातळीवरचा राजकीय हस्तक्षेप होणार नाही
आतापर्यंत होत असलेल्या पंचनामाच्या तुलनेत खूप कमी कालावधीमध्ये म्हणजेच अवघ्या 7 ते 10 दिवसात ई पंचनाम्याची शेतापासून मंत्रालय पर्यंतची प्रक्रिया पूर्ण होईल
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई डीबीटी प्रणाली द्वारे मंत्रालयातून एका क्लिकवर त्यांच्या खात्यात उपलब्ध करून देता येईल. नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी पंचनामा मोहिमेची संकल्पना मांडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: