Mohan Bhagwat : 76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना महिलांच्या आदराविषयी बोलले होते. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनीही महिलांचा सन्मान आणि सक्षमीकरणावर भर दिला आहे. नागपुरात 'अखिल भारतीय महिला चरित्र कोष प्रथम खंड' या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी भागवत बोलत होते. भारताचे 'विश्वगुरू' बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी महिलांचे महत्त्व अधोरेखित केले.


महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरण घरापासून सुरू झाले पाहिजे
भारतीय कुटुंब व्यवस्थेबाबत बोलताना मोहन भागवत यांनी सांगितले की, महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरण घरापासून सुरू झाले पाहिजे आणि त्यांना समाजात त्यांचे योग्य स्थान मिळाले पाहिजे. ते म्हणाले की, महिलांना 'जगत जननी' म्हटले जाते, पण त्यांच्या घरात त्यांना 'गुलाम' म्हणून वागवले जाते. 


'भारताला विश्वगुरू म्हणून घडवायचे असेल, तर....
आरएसएस प्रमुख भागवत म्हणाले, 'भारताला विश्वगुरू म्हणून घडवायचे असेल, तर केवळ पुरुषांचा सहभाग पुरेसा नाही, तर महिलांचाही समान सहभाग आवश्यक आहे. भारतीय महिलांच्या स्थितीवर सामान्य विधान करणे खूप कठीण आहे. "प्रत्येकाची परिस्थिती आणि पार्श्वभूमी वेगळी असते तसेच या समस्यांचे निराकरण आणि समस्या वेगळ्या असतात." भागवत म्हणाले की, प्राचीन काळापासून पुरुष आणि स्त्री यांच्यात श्रेष्ठ कोण यावर कोणताही वाद नाही, कारण दोघेही समान आहेत आणि त्यांना एकत्र राहायचे आहे.


महिलांना त्यांच्या घरात हक्काचे स्थान दिले जात आहे का?
मोहन भागवत म्हणाले की, जगातील मूल्ये, विवाह, स्त्रीस्वातंत्र्य आणि कुटुंब यावर टीका करणारे आज भारतीय कुटुंब पद्धतीवर संशोधन करत आहेत. "आम्ही हजारो वर्षांपासून (भारतीय कुटुंब व्यवस्थेच्या गुणवत्तेबद्दल) जे बोलत आहोत, महिलांना त्यांच्या घरात हक्काचे स्थान दिले जात आहे का, याचा विचार करण्याची वेळ आल्याचे भागवत म्हणाले. आरएसएस प्रमुख म्हणाले, "एकीकडे आपण तिला जगत जननी मानतो, पण दुसरीकडे आपण तिला घरातल्या "गुलाम" म्हणून वागवतो. महिलांना चांगले वातावरण देण्याची गरज आहे. महिलांनी प्रबुद्ध, सशक्त आणि शिक्षित व्हायला हवे. आणि ही प्रक्रिया घरापासून सुरू झाली पाहिजे.


पुरुषांनी श्रावण महिन्यात 'या' ग्रंथाचे पारायण केले पाहिजे


भारतीय महिला चरित्र कोश हा ग्रंथ सगळ्यांनी विकत घेतला पाहिजे आणि पुरुषांनी श्रावण महिन्यात त्याचे पारायण केले पाहिजे. आपण जिजामाता नसत्या तर शिवाजी महाराज नसते हे सगळं बोलतो, पण आपल्या घरी आपल्या आईचे हे स्थान आहे का? महिला उत्थान हा पुरुषांच्या प्रबोधनाचा भाग आहे, असे मोहन भागवत म्हणाले. 


संबंधित बातम्या


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजकारणात उतरणार का? मोहन भागवत म्हणाले... 


Mohan Bhagawat : मोहन भागवतांचे ज्ञानवापीबाबत मोठे वक्तव्य, 'प्रत्येक मशिदीत शिवलिंग का पाहता?'