Maharashtra Monsoon Session LIVE :  सभागृहात आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची पहिल्याच दिवशी दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं.  आरोग्याच्या सबंधित विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर देताना सावंतांची चांगलीच दमछाक झाली.  पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या संबंधित प्रश्नावर नेमकी माहिती आरोग्यमंत्री सभागृहाला देऊ शकले नाहीत. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. अखेरीस प्रश्न मागे ठेवावा लागला. त्यानंतर बीड येथील स्त्री भृण हत्या प्रश्नी उत्तर देताना बीड जिल्हा यासाठी प्रसिद्ध आहे असं वक्तव्य आमदार भारती लव्हेकर यांनी केलं, त्यानंतही विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला.  


विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात केलल्या प्रश्नांच्या भडीमाराची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना देता न आल्याने प्रश्न उत्तरासाठी राखून ठेवण्याची नामुष्की शिंदे सरकारवर आली. आता या प्रश्नाचं उत्तर आता सरकारकडून सोमवारी दिलं जाणार आहे. 


अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत यंत्रणेसाठी मंजूर अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे, भरण्यात आलेली पदे, रिक्त पदांची संख्या, हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी मंजूर निधी, मागील वर्षात खर्च झालेला निधी या प्रश्नांची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना विचारली होती. ही माहिती आरोग्यमंत्र्यांकडे नसल्याने त्यांना उत्तर देता आले नाही आणि प्रश्न उत्तरासाठी सोमवारपर्यंत राखून ठेवण्यात आला. शिंदे सरकारला विचारलेला पहिलाच प्रश्न राखून ठेवावा लागला. 


पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या प्रादुर्भावाचा प्रश्न गंभीर असून ऑक्टोबर 2021 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातल्या 80 बालकांना रोगाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. डहाणू, विक्रमगड, तलासरी तालुक्यातील 29 बालकांना या रोगाची लागण झाली आहे. यासंदर्भात प्रश्न विचारताना अजित पवार म्हणाले की, डासांमुळे पसरणारा हत्तीरोग गंभीर असून त्यामुळे शरीर विद्रुप आणि अकार्यक्षम होते. लागण झाल्यावर या आजारावर परिणामकारक उपचार नाहीत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्वाच्या आहेत. याकडे लक्ष वेधून अजित पवार यांनी जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यक्षम होण्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. 


हत्तीरोग नियंत्रण यंत्रणेसाठी मंजूर अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे, त्यापैकी भरण्यात आलेली पदे, रिक्त पदांची संख्या, हत्तीरोग प्रतिंबंक उपाययोजनांसाठी पालघर जिल्ह्यासाठी मंजूर निधी व वर्षभरात खर्च झालेला निधी या प्रश्नांची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना देता आली नाहीत. त्यामुळे हा प्रश्न उत्तरासाठी सोमवापर्यंत पुढे ढकलण्यात आला.



इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra Monsoon Assembly Session : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, 'या' मुद्द्यांवर विरोधक होणार


Maharashtra Monsoon Session LIVE : पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर