एक्स्प्लोर
खड्ड्यांपासून जीवाला धोका, तरुणाची पोलीस संरक्षणाची मागणी
कल्याणच्या शिवाजी चौकात मागच्या महिनाभरात झालेल्या दोन अपघातांनंतर नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून त्यामुळेच ही मागणी करण्यात आली आहे.

कल्याण : जीवाला कल्याण-डोंबिवलीतल्या खड्ड्यांपासून धोका असल्यामुळे आपल्याला पोलीस संरक्षण मिळावं, अशी मागणी डोंबिवलीच्या एका तरुणाने पोलिसांकडे केली आहे. कल्याणच्या शिवाजी चौकात मागच्या महिनाभरात झालेल्या दोन अपघातांनंतर नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून त्यामुळेच ही मागणी करण्यात आली आहे. कल्याणच्या शिवाजी चौक परिसरात गेल्या महिनाभरात पेव्हर ब्लॉकमुळे दोन अपघात झाले आहेत. यात एका लहान मुलाचा आणि एका महिलेचा मृत्यू झाला. तर नातेवाईकांसोबत निघालेल्या मनीषा भोईर या महिलेचा हकनाक बळी गेला. यानंतर चिराग हरिया या तरुणाने आपल्या जीवाला कल्याण-डोंबिवलीतल्या खराब रस्त्यांपासून धोका असल्याचं म्हणत थेट पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. चिराग हा डोंबिवलीचा रहिवासी असून कल्याण-डोंबिवलीत दुचाकीवर त्याचं येणं जाणं असतं. त्यामुळे पोलिसांनी मला संरक्षण द्यावं, त्याचे पैसे भरण्याची माझी तयारी असल्याचं चिरागचं म्हणणं आहे. अपघात झाल्यानंतर कल्याणमधल्या रस्त्यांवर बसवण्यात आलेले पेव्हर ब्लॉक्स हा विषय चर्चेत आलाय. वास्तविक, सिमेंटचा रस्ता तयार करताना संपूर्ण रस्ता सिमेंटचा असणं गरजेचं असतानाही रस्त्याच्या तब्बल 60 टक्के भागात पेव्हर ब्लॉक्स बसवण्यात आले आहेत. हे पेव्हर ब्लॉक सध्या नागरिकांच्या जीवावर उठले आहेत. रस्त्यावर बसवण्यात आलेले हे पेव्हर ब्लॉक ठेकेदाराचे उखळ पांढरे करण्यासाठी बसवण्यात आल्याचा आरोप होत आहे. कल्याणमध्ये अनेक ठिकाणी सिमेंटचे पैसे वाचवून भ्रष्टाचार करण्यासाठीच अशाप्रकारे पेव्हर ब्लॉक्सचा वापर होत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केलाय. ज्या ठिकाणी हा अपघात घडला, तिथे बसवण्यात आलेले पेव्हर ब्लॉक्स हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून ते मूळ रस्त्यापासून खाली दबले गेले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांचे इथे अनेकदा अपघात होत असतात. याविरोधात कल्याणच्या नागरिक आणि व्यापाऱ्यांनीही अनेकदा महापालिकेकडे तक्रार केली, मात्र हा रास्ता एमएसआरडीसीकडे येत असल्याचं सांगत महापालिकेने दरवेळी हात वर केले. त्यामुळे आता केडीएमसी आणि एमएसआरडीसी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली आहे. कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांनीही याबाबत अधिवेशनात मागणी करणार असल्याचं सांगितलं आहे. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी हे खड्डे तात्काळ बुजवण्याचे आदेश केडीएमसीला दिले आहेत. एकाच ठिकाणी महिनाभरात दोन जणांचे जीव गेल्यानंतर आता तरी कल्याण डोंबिवली महापालिका स्वतःहून इथे काही डागडुजी करते का? आणि अजून किती जणांना खड्ड्यांपासून वाचण्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी करण्याची वेळ येते, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
आणखी वाचा























