भिवंडीत एकतर्फी प्रेमातून तरुणीवर घरात घुसून हल्ला, आईसमोरच मुलीवर सपासप वार
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूने वार केल्याची घटना भिवंडीत घडली आहे. तरुणीवर वार केल्यानंतर आरोपीने स्वत:चाही गळा कापला. सध्या दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे.

भिवंडी : भिवंडीमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणाने मुलीच्या घरात घुसून तिच्यावर चाकूने सपासप वार केले. यानंतर त्याने स्वत:चाही गळा कापला. या घटनेत दोघांचीही प्रकृती चिंताजनक असून ठाण्यातील कळव्यामधील रुग्णालयात उपचार सुरु आहे. आरोपी तरुण 18 वर्षांचा असून जखमी तरुणी अल्पवयीन आहे.
भिवंडी शहरातील फेनागाव परिसरात काल (21 एप्रिल) संध्याकाळी पाच-सहाच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी तरुणाचं संबंधित मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. हा तरुण तिची नेहमीच छेड काढायचा, अशी तक्रार मुलीच्या नातेवाईकांनी काही वरिष्ठांकडे होती. तसंच तरुणाच्या कुटुंबालाही याची माहिती देण्यात आली होती. मात्र याचा राग मनात ठेवून आरोपी तरुणाने धारदार शस्त्रासह मुलीच्या घरात प्रवेश केला. मुलीच्या आईसमोरच तिच्या गळावर सपासप वार केले. त्यानंतर स्वत:च्या गळ्यावरही वार करुन तिथून पळ काढला.

या संपूर्ण घटनेत दोघेही गंभीररित्या जखमी झाले. शेजाऱ्यांनी तात्काळ दोघांनाही उपचारांसाठी भिवंडीतील एका खाजगी रुग्णालयात नेले. मात्र त्यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्यांना ठाण्यातील कळवा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. सध्या दोघांची परिस्थिती चिंताजनक असून भिवंडी शहर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Before You Go
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report





















