मुंबई : येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची पत्नी बिंदू आणि दोन मुली रोशनी आणि राधा यांना सोमवारी मुंबई हायकोर्टाने कोणताही तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला आहे. डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं दिलेल्या आदेशाला त्यांनी आव्हान दिलं आहे. या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा न्यायालयाने यावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली.

  


येस बँकेच्या 3 हजार 700 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आणि ईडीकडून तपास केला जात आहे. आर्थिक अनियमितता आणि बेहिशेबी कर्जवाटप यामुळे रिझर्व्ह बँकेनं येस बँकेवर 5 मार्चपासून निर्बंध लागू केले होते. मात्र त्यानंतर टप्याटप्याने ते शिथिल केले आणि येस बँकेचे व्यवहार पूर्ववत केलेत. मात्र बड्या उद्योगांना दिलेली कर्ज बुडीत खात्यात गेल्यानं बँकेची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. हा घोटाळा उघड झाल्यानंतर येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक करण्यात आली होती. त्यांनंतर त्यांची पत्नी बिंदूसह दोन मुली रोशनी आणि राधा यांनाही अटक करण्यात आली. सीबीआयच्या विशेष न्यायालयानं 18 सप्टेंबर रोजी त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावत त्यांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्या निर्णयाला आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.  


सीबीआय न्यायालयानं दिलेला आदेश बेकायदेशीर आणि अयोग्य असल्याचा दावा याचिकेतून केलेला आहे. चौकशीदरम्यान आपल्याला अटक करण्यात आली. मात्र आपण सीबीआयला तपासात संपूर्ण सहकार्य केल्याचा दावा त्यांनी या याचिकेतून केला आहे. या प्रकरणातील सर्व पुरावे कागदोपत्री स्वरूपाचे असून आधीच सीबीआयच्या ताब्यात आहेत आणि त्यामुळे कागदपत्रांशी किंवा पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच कथित व्यवहारांमध्ये किंवा येस बँकेमध्ये किंवा त्यांच्या दैनंदिन व्यवहारात आपली कोणतीही भूमिका नव्हती असा दावाही याचिकेतून करण्यात आला आहे. 


महत्वाच्या बातम्या :