Mumbai Vaccination : देशासह राज्यातही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजनाही केल्या जात आहेत. सध्या तरी कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लस हेच प्रमुख अस्त्र असल्याचं बोललं जात आहे. देशभरात सध्या लसीकरण मोहीम सुरु आहे. परंतु, वारंवार लसीकरण मोहिमेत पुरेशा लसीसाठ्याअभावी वारंवार अडथळे येत आहेत. आज म्हणजेच, 21 सप्टेंबर रोजी मुंबईतील सरकारी आणि सार्वजनिक लसीकरण केंद्रांवर मर्यादीत लससाठा उपलब्ध असल्यामुळं मर्यादीत लससाठा उपलब्ध असल्यानं मर्यादित लसीकरण केंद्रांवर लसीकरण केलं जाईल.
कोरोना-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळं बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर आज (मंगळवार) दिनांक 21 ऑगस्ट 2021 रोजी काहीच लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरु राहिल, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे. दरम्यान, काल (दिनांक 20 सप्टेंबर 2021) रात्री उशिरापर्यंत महानगरपालिका प्रशासनाला कोविड लससाठा उपलब्ध झाला आहे. या साठ्याचं वितरण आज मंगळवार, दिनांक 21 सप्टेंबर 2021 रोजी दिवसभरात विविध शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांना करण्यात येईल. त्यामुळे बुधवार, दिनांक 22 सप्टेंबर 2021 पासून सर्व 316 शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु होईल.
लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेऊन मुंबईकर नागरिकांना सातत्यानं अवगत करण्यात येतं. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहनही मुंबई महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे.
देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असून काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळतं. हे जरी खरं असलं तरी कोरोनापासून बचावासाठी सध्या एकमेव मार्ग म्हणजे लसीकरण, असं तज्ज्ञांच्या वतीनंही वारंवार सांगितलं जात आहे. 16 जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. अशातच मुंबईतही 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली होती. आतापर्यंत मुंबईकरांनी लसीकरणाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 419 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 419 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 447 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,19,394 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मागील 24 तासात मुंबईत एकूण 31 हजार 880 नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. मुंबईत गेल्या 24 तासात पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4595 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1194 दिवसांवर गेला आहे.