Mumbai Corona : मुंबईत नुकताच गणेशोत्सव पार पडला. पुढील 15 दिवस आता मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. गेल्या वर्षी गणेशोत्सवानंतरच कोरोनाची दुसरी लाट आल्याचं पहायला मिळालं होतं. त्यामुळेच यंदाच्या गणेशोत्सवाच्या नंतरच्या 15 दिवसांवर प्रशासनाची बारीक नजर असणार आहे.
सध्या मुंबईसह अवघ्या महाराष्ट्रावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावट आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवानंतर मुंबईतील आणि राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे येणारे 15 दिवस धोक्याचे आणि अत्यंत महत्वाचे असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबईतून बाहेर गेलेले लोक आता मुंबईत परत येत आहेत. त्यामुळे बाहेरुन येणाऱ्या या लोकांनी RTPCR चाचणी करावी असं आवाहन मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केलं आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने कंबर कसली असून कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. मुंबईत 266 ठिकाणी आरटीपीसीआर चाचणी केंद्रं सुरु करण्यात येत असून बाहेरुन येणाऱ्या लोकांची कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 419 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 419 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 447 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,19,394 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मागील 24 तासात मुंबईत एकूण 31 हजार 880 नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. मुंबईत गेल्या 24 तासात पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4595 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1194 दिवसांवर गेला आहे.
कोरोना सावटात पार पडणार तुळजाभवानीचा शारदीय नवरात्रोत्सव; कोरोना सावटामुळं मंदिर भक्तांसाठी बंद