Mumbai: मुंबईत रिक्षातून प्रवास करताना पाच लाखांचे दागिने आणि रोख रक्कम विसरणाऱ्या 61 वर्षीय महिलेच्या मदतीला मुंबई पोलीस धावून आले. ई-चलानच्या मदतीनं मुंबई शहर वाहतूक पोलिसांनी संबंधित महिलेला तिचे दागिने आणि रोख रक्कम परत केली. त्यानंतर महिलेनं मुंबई पोलिसांचे आार मानले. ही घटना सोमवारी घडली होती.
लक्ष्मी परमेश्वर चौधरी (वय, 61) असं फिर्यादी महिलेचं नाव असून चेंबूरच्या वाशिनाका येथील राहुल नगर परिसरात राहते. संबंधित महिला आपलं काम आटपून एच.पी नगर गेटजवळ उभा असणाऱ्या शेअरिंग ऑटोनं आपल्या घरी जात होती. परंतु, रिक्षातून उतरताना तिच्याकडे असणाऱ्या पिशव्यांपैकी एक पिशवी ऑटो रिक्षामध्येच राहिली. हा संपूर्ण प्रकार घरी गेल्यानंतर चौधरी यांच्या लक्षात आला. याबाबत चौधरी यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित रिक्षाचा शोध घ्यायला सुरुवात केली.
पोलीसांनी सदर घटनेबाबत माहिती देऊन सदर महिला बसलेल्या ऑटो रिक्षाचा शोध घेणे कामी गुन्हे प्रकटीकरणाचे सपोनि मांढरे व पथक यांनी सदर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहून वाहतूक विभागाच्या ई-चलन मशीनद्वारे सदर ऑटो रिक्षाचा क्रमांक बघितला. त्यानंतर सदर ऑटो रिक्षा ही भाडे वाहतुकीसाठी विष्णू नगर येथे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आल्यानं सदर ऑटो रिक्षाचे मालकांची पोलिसांनी चौकशी केली. परंतु, रिक्षा चालकानं नकार देत आपण सदर दागिन्यांची पिशवी बघितली नसल्याचं कारण दिलं. पण चौकशीदरम्यान रिक्षाच्या सीटच्या मागच्या डीकी वर सदर दागिन्यांची पिशवी आढळून आली.
त्यानंतर पोलीसांनी रिक्षा चालक आणि संबंधित महिलेला स्थानिक पोलीस ठाणे आरसीएफमध्ये घेऊन गेले. तसेच महिलेच्या ताब्यामध्ये 4,50,000 किमतीचे आठ तोळे सोन्याचे दागिने, अंदाजे रक्कम रुपये 20,000 किमतीचे चांदीचे दागिने, रोख रक्कम रुपये 18,000 देण्यात आले", अशी माहिती आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब घावटे यांनी दिली.
हे देखील वाचा-